अहिल्यानगर-महायुती सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज शिर्डीचा दौरा केलाय. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. भिकारीमुक्त साई देवस्थान आणि मोफत भोजन व्यवस्था बंद या सुजय विखेंच्या वक्तव्याचा मी आज शिर्डी दौऱ्यावर असताना पूर्ण अर्थ समजून घेतलाय. काल मला पूर्ण वस्तुस्थिती माहीत नव्हती, तर मी त्यांच्या वक्तव्यास विरोध केला होता. मात्र आज त्याबाबत मी व्यवस्थित माहिती घेतली असून, सुजय विखेंचा भक्ताचा कोणताही अनादर करण्याचा उद्देश नसल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय. शिर्डीत संजय शिरसाट पत्रकारांशी बोलत होते.
विरोधक काय बोलतात याला महत्त्व नाही :विविध भागातून शिर्डीत बसने किंवा ट्रकने नशा करणारे येतात. त्यांना पायबंद घालावा, त्या वक्तव्यामागे असा उद्देश सुजय विखेंचा होता. भाविकांचा अनादर करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यामुळे आता या वादावर पडदा पडावा, अस मला वाटतंय, असेही संजय शिरसाट म्हणालेत. शिर्डी देवस्थानाचं प्रसादालय आहे, ते तसंच सुरू राहील आणि तिथे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असंही सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय. विरोधक काय बोलतात याला महत्त्व नाही, वस्तुस्थिती काय असते हे समजून घेतलं पाहिजे. सुजय विखेंनी मला वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे विरोधाला विरोध करायचा नसतो. भूमिका समजून घेणं गरजेचं असल्याचंही मतही त्यांनी व्यक्त केलंय.