पुणे Pooja Khedkar : वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दृष्टिहीन तसंच मानसिक आजारी असल्याची चुकीची माहिती दिल्याचा आरोप होत आहे. विविध आरोपानंतर त्यांची पुण्यातून वाशीमला उचलबांगडी करण्यात आली. आता या प्रकरणात पूजा खेडकर यांनी वापरलेली 'लाल दिव्याची' ऑडी कार वाहतूक विभागानं चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात आणली आहे. पुढील तपासणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
ऑडी कारवर 21 चलन प्रलंबित : पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर 'महाराष्ट्र शासन' तसेच लाल दिवा लावला होता. ती कार थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आहे. विविध नियमांचे उल्लंघन केल्यानं या कार मालकावर 21 चलनातून दंड ठोठावण्यात आली आहेत. पूजा खेडकर यांनी कारवर लाल दिवा लावला होता. तसंच कारवर महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं. 2022 पासून आतापर्यंत त्यांच्या कारवर वाहतुकीचे नियम मोडणे, वाहन अतिवेगानं चालवणं, सिग्नल तोडणे असे 21 चलन प्रलंबित आहेत, अशी माहिती पोलिसांकडूंन देण्यात आली होती.
मनोरमा खेडकर यांच्याकडे पिस्तूलचा अधिकृत परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे शहर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना नोटीस बजाविली आहे. नोटीसमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे की, "तुम्ही शस्त्राचा दुरुपयोग करून परवाना विषयक अटी आणि शर्तीचा भंग केला आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना का रद्द करण्यात येऊ नये? याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. येत्या 10 दिवसात तुमचे उत्तर कार्यालयास लेखी स्वरुपात सादर करावं. तसेच मुदतीत तुमचे उत्तर प्राप्त न झाल्यास या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल." ही नोटीस पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या घराबाहेर लावली आहे."