मुंबई IAS Pooja Khedkar Called Back To Mussoorie : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा दणका बसला आहे. पूजा यांना परत मसुरीला बोलावण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त करण्यात आले आहे, असे पत्र त्यांना अतिरिक्त प्रधान सचिव नितीन गद्रे यांनी दिलं. त्यांना असंही निर्देश देण्यात आले आहेत की, 23 जुलै 2024 पूर्वी लवकरात लवकर कोण्त्याही परिस्थितीत अकॅडमीमध्ये हजर राहायचे आहे.
पूजा खेडकर यांना पाठवलेलं पत्र (ETV BHARAT Reporter) पूजा खेडकर अडचणीत? :IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर सरकारनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसंच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त करण्यात आलं आहे. याबाबत लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनं त्यांना पत्र पाठवलं आहे. त्यामुळं पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
पूजा खेडकर यांना दणका : लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनं (LBSNAA) च्या 16 जुलै रोजी अधिकृत अधिसूचनेनुसार, पूजा खेडकर यांना महाराष्ट्रातील प्रशिक्षण कर्तव्यातून मुक्त करण्यात आलं आहे. त्यांना लवकरात लवकर अकादमीत परतण्यास सांगण्यात आलं आहे. खेडकर यांच्या नागरी सेवेतील निवडीवरून वाद निर्माण झाल्यानंतर काही दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. IAS होण्यासाठी अपंगत्व, इतर मागासवर्गीय कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पूजा खेडकर यांच्या उमेदवारीची पडताळणी करण्यासाठी केंद्रानं गेल्या आठवड्यात एक सदस्यीय समिती स्थापन केली होती.
नियम काय सांगतो? : "ट्रेनी अधिकारी असतात, ज्यांना आपण भारतीय सेवेतील प्रशिक्षणार्थी म्हणतो. यासाठी 1954 चे नियम आहेत आणि त्या नियमानुसार केंद्र शासन यांचं प्रशिक्षण कसं व्हावं हे ठरवतं. याला प्रोबेशनरी कालावधी असं म्हणतात. तो कालावधी दोन वर्षासाठी असतो. त्यादरम्यान मसुरीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर फाऊंडेशन कोर्सेस होतात. त्यानंतर एक वर्षाचं ट्रेनिंग हे जिल्ह्यांमध्ये असतं. त्यानंतर ते पुन्हा काही कालावधीसाठी मसुरीला फेज 2 ला जातात. या कालावधीमध्ये जर प्रशिक्षणामध्ये काही त्रुटी आढळल्या तर सर्विसमधून काढण्याचीसुद्धा तरतूद आहे," अशी प्रतिक्रिया माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. पूजा खेडकर प्रकरणावर बोलताना महेश झगडे म्हणाले की, "पूजा खेडकर या केंद्र शासनाच्या आस्थापनेवर आहेत. मसुरीमधून त्यांना प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रात पाठवलं आहे. त्यामुळं परत त्यांना मसुरीमध्ये बोलावलं असेल. प्रशिक्षणामध्ये जर समाधानी नसेल तर परत मसुरीला बोलावण्याचा अधिकार शासनाला असतो. एकदा सिलेक्शन झालं की त्यांना वेगवेगळी राज्य वाटून दिली जातात."
पूजा खेडकर यांचा 'कार'नामा : वेगवेगळ्या डिमांडमुळं चर्चेत आलेल्या पूजा खेडकरांबद्दल रोज नवनव्या बातम्या समोर येत आहेत. प्रशिक्षणार्थी असतानाही स्वतःला स्वतंत्र केबिन आणि सरकारी गाडीची मागणी पूजा खेडकरांनी केली होती. त्यानंतर त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांची केबिन बळकावून त्या ठिकाणी स्वतःचे फर्निचर ठेवले. तसेच स्वतःच्या ऑडी कारवर अंबर दिवा लावला. यामुळे पूजा खेडकर चांगल्याच चर्चेत आल्या.
हेही वाचा -
- वाशिम पोलिसांकडून चौकशी नाही, मीच त्यांना बोलावलं होतं-पूजा खेडकर - IAS Pooja Khedkar
- पूजा खेडकर यांचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; 'YCM' रुग्णालयातूनसुद्धा मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र - IAS Pooja Khedkar
- पूजा खेडकर यांना विचारले अनेक प्रश्न पण उत्तर मा्त्र एकच "माझं जे काही असेल..." - IAS Pooja Khedkar