पुणे Pooja Khedkar Case: पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर यांच्या बाबत एकएक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. सुरुवातीला अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण, त्यानंतर तब्बल सहा वेळा मेडिकल टेस्टला गैरहजर आणि मग बलाढ्य संपत्ती असताना नॉन क्रिमीलेयर दिलेलं प्रमाणपत्र अशी माहिती समोर आली असताना आता पूजा खेडकर यांच्या बाबत अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. त्यांची युपीएससी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. असं असताना आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त करत या प्रकरणाची पारदर्शक पद्धतीनं चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
लोकशाहीत सर्वांना बोलायचा अधिकार :खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आज अजित पवार यांच्या पक्षाच्यावतीनं बारामतीत सभा आयोजित करण्यात आली होती. यात अजित पवार यांनी केलेल्या भाषणाबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, लोकशाहीत सर्वांना बोलायचा अधिकार आहे. त्यांची स्टेटमेंट देखील छान आहे; पण भाजपाचे दोन खासदार संविधान बदलणार असं बोललं होते. तसेच शपथ घेताना भाजपाचे लोकं चुकीचे बोलले आणि भाजपाचे लोक आम्ही संविधान बदलणार असं बोलत आहे, असं यावेळी सुळे म्हणाल्या.