अमरावती : सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह करून सुखी संसाराची स्वप्नं रंगविणाऱ्या एका दांपत्याचा आज दुर्दवी शेवट झाला. पत्नीची गळा आवळून तिची हत्या केल्यानंतर स्वतः पतीनेसुद्धा आत्महत्या करून जीवन संपवील्याचा धक्कादायक प्रकार रहाटगाव येथील प्रज्ज्वल पात्रे यांच्या शेतात घडला. अमोल सुरेशराव गायकवाड (३५), आणि शिल्पा अमोल गायकवाड (३२) असं घटनेतील मृतकांची नावे आहेत.
अशी समोर आली आहे घटना :मूळचे धामणगाव तालुक्यातील वाठोडा आणि सध्याचे रहाटगाव येथील रहिवासी अमोल सुरेशराव गायकवाड आणि रामगाव येथील शिल्पा अमोल गायकवाड यांचा सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. कल्पदीप मंगलकार्यालय मागे असलेल्या जिल्हा पुरवठा कार्यालयातील पुरवठा निरिक्षक प्रज्वल विठ्ठलराव पात्रे यांच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते. त्याठिकाणी असलेल्या दुमजली फार्म हाऊसमध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वी अमोलचे वडील बाहेरगावी गेले होते आणि रविवारी सकाळी परत आल्यानंतर त्यांनी मुलगा आणि सुनेला आवाज दिला. मात्र, त्यांना प्रतिसाद न मिळाल्यानं अमोलच्या वडिलांनी खोलीत जाऊन बघितलं तर खोलीत पलंगावर शिल्पाचा मृतदेह दिसला तर अमोलचा फासावर अडकलेला मृतदेह आढळला. अशी माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली.