छत्रपती संभाजीनगर Honour Killing Case :मुलीनं आंतरजातीय विवाह केल्यानं वडील आणि भावाला राग आला. त्यानंतर त्या दोघांनी मुलीच्या नवऱयाचा खून केला. या प्रकरणी खून करणाऱ्या मुलीच्या भावाला जवाहरनगर पोलिसांनी अखेर अटक केली. घटनेच्या जवळपास 13 दिवसांपासून तो पाहुण्यांकडं आश्रय घेऊन राहत होता. मात्र, पोलिसांनी त्याला फुलंब्री तालुक्यातून अटक केली. तर मुलीच्या वडिलांचा अद्याप तपास सुरू आहे. आंतरजातीय विवाह केल्यानं मुलीच्या वडिलांनी आणि चुलत भावाने मुलाला भर रस्त्यात चाकू खुपसून जखमी केलं होतं. गुरुवारी (18 जुलै) रात्री उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.
प्रतिक्रिया देताना मृत मुलाचा भाऊ सुमित साळुंके (ETV BHARAT Reporter) सासऱ्यानं केला जावयाचा खून : छत्रपती संभाजीनगर शहरातील इंदिरानगर भागात आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून सासऱ्यानं आणि चुलत भावानं जावयाचा खून केल्याची घटना 14 जुलैला घडली होती. घटनेनंतर मारेकरी सासरा गीताराम भास्कर कीर्तीशाही आणि त्याचा पुतण्या आप्पासाहेब अशोक कीर्तीशाही हे खून करून पसार झाले होते. पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेतला. मात्र, त्यापैकी आप्पासाहेब अशोक कीर्तीशाही याला फुलंब्रीतून अटक केली.
भावाला फुलंब्रीतून अटक : आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून या दोघांनी जावई अमित साळुंखे याचा खून करून पसार झाले होते. त्यात मुलीचा भाऊ अप्पासाहेब आपल्या पहुण्याकडे आश्रय घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपायुक्त नितीन बागडे यांच्या विशेष पथकाने त्याला फुलंब्रीतून ताब्यात घेत अटक केली.
आंतरजातीय विवाह केल्याने केला खून : अमित साळुंके आणि विद्या कीर्तीशाही दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते, कालांतराने एकमेकांवर प्रेम जुळले. कुटुंबीय लग्नाला तयार होणार नाहीत हे माहीत असल्यानं त्यांनी एप्रिल महिन्यात पुण्याला पळून जाऊन लग्न केलं होतं. अमितच्या कुटुंबीयांनी त्यांचा विवाह मान्य केल्यानं २ मे रोजी ते घरी परतले. विद्याच्या कुटुंबीयांचा राग घालवण्यासाठी मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या समाज पद्धतीने विवाह करून दिला होता. परंतु, विद्याच्या कुटुंबाच्या मनातला राग गेला नव्हता. विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तीशाही आणि चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तीशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. १४ जुलैला अमित परिसरात फिरत असताना गीताराम आणि आप्पासाहेबने त्याच्यावर चाकूने गंभीर वार केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अमित झाला होता गंभीर जखमी : अमितच्या पोटावर आणि छातीत खोलवर वार झाल्यामुळं त्याचा घाटीच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमितवरील हल्ल्याला ११ दिवस उलटूनही मारेकऱ्यांना जवाहरनगर पोलिसांनी अटक न केल्यानं अमितच्या पत्नीसह त्याच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला होता. अमितच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत त्याच्या कुटुंबीयांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. रात्री उशिरापर्यंत कुटुंब ठाण्यात ठाण मांडून होतं. शुक्रवारी (19 जुलै) दुपारी तीन वाजता अमितवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सासरे गीताराम आणि आप्पासाहेब व्यतिरिक्त पाच ते सहा जणांनी अमितवर हल्ला केल्याचंही अमितच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
हेही वाचा -
- Kumbakonam Honor Killing: आंतरजातीय विवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याची हत्या
- Inter Caste Marriage : आंतरजातीय विवाह केला म्हणून दाम्पत्यावर गाव सोडण्याची वेळ
- आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबाला टाकले वाळीत; अंनिस आणि पोलिसांच्या मध्यस्थीने कुटुंबाला न्याय