मुंबई Devendra Fadnavis On Encounter :बदलापूर चिमुकल्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याचं पोलिसांनी सोमवारी सायंकाळी एन्काउंटर केलं. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मोठा हल्लाबोल केला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं रोखठोक उत्तर दिलं. "अक्षय शिंदे याला चौकशीसाठी नेताना त्यानं पोलिसांचं पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला. यात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. पोलिसांवर कोणी बंदूक उचलेल तर पोलीस काहीतरी करणारचं ना," असा रोखठोक सवाल यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना विचारला.
काय म्हणाले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस :ठाणे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केला. यावर विरोधकांनी चांगलाच गदारोळ सुरू केला. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली. यावेळी त्यांनी "आरोपी अक्षय शिंदे याच्या अगोदरच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात अक्षय शिंदे याच्याविरोधात अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात चौकशीसाठी अक्षय शिंदे याला चौकशीसाठी पोलीस नेत होते. यावेळी अक्षय शिंदे यानं सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेची पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यानं तीन राऊंड फायर केले. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला. यात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. कोणीही पोलिसांवर बंदूक उचलेल, तर पोलीस काहीतर करतील ना," असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.