छत्रपती संभाजीनगर Amit Shah Visit To Maharashtra : मंगळवारचा दिवस राज्यातील राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी हॉटेल रामा इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. त्यामुळे राज्याच्या निवडणुकीतील राजकीय गणितांची खलबतं रंगणार आहेत. त्यामुळे नेमकी काय चर्चा रंगणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अमित शाह घेणार आढावा :केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह मंगळवारी एमजीएम रुक्मिणी सभागृहात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. जवळपास दोन तास हा मेळावा असणार असून मराठवाड्यातील 46 मतदार संघाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला जवळपास 900 पदाधिकाऱ्यांची हजेरी असणार आहे. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह शहरातच मुक्कामी असणार असून हॉटेल रामा इथं काही खासगी बैठका घेणार आहेत. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी सकाळी वेरूळ इथल्या घृष्णेश्वर मंदिर दर्शन घेऊन ते नाशिककडं रवाना होतील, अशी माहिती भाजपा तर्फे देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे - अजित पवार येणार शहरात :गृहमंत्री अमित शाह मंगळवारी नागपूर इथं कार्यक्रमाला हजेरी लावतील. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथं भाजपाच्या मेळाव्यासाठी ते हजर राहतील. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शहरात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री साडेआठ वाजता विमानानं शहरात दाखल होणार आहेत. तर दोन तास हॉटेल रामा इथं त्यांची वेळ राखीव असून त्यानंतर ते पुन्हा मुंबईकडं रवाना होणार आहेत. दुसरीकडं त्याचवेळी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे देखील शहरात येणार आहेत. सायंकाळी राष्ट्रवादी मेळाव्याला ते हजेरी लावतील, नंतर हॉटेल रामा इथं ते देखील येणार आहेत. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांचा हॉटेलमधील असलेला राखीव वेळ आणि त्याच दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचाही त्याच ठिकाणी असलेला राखीव वेळ यामुळे, तिथं राज्यातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं महत्त्वाची गुप्त बैठक होणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा :
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 24 आणि 25 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर - Amit Shah Maharashtra Tour
- नरेंद्र मोदी, अमित शाह ते शरद पवार 'यांनी' राजकारणासोबतच गाजवलंय क्रिकेटचं मैदान - Political Interference in Cricket
- 'बिहार पॅटर्न'ची चर्चा धादांत खोटी, यात तसूभर देखील सत्य नाही; अजित पवारांची प्रतिक्रिया - Ajit Pawar Amit Shah