बुलडाणा Sailani Baba Festival : सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या बुलडाणा जिल्हातील सैलानी बाबा (Sailani Baba) महोत्सवाची नारळाच्या होळीनं सुरुवात झाली. नारळांची होळी करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी बाबा यांच्या यात्रेला सुरुवात होत असते. हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्गावर चादर चढविल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर होळी पेटवली जाते. तर भाविक श्रद्धा म्हणून नारळ, जुने कपडे अंगावरून ओवाळून या होळीमध्ये अर्पण करतात.
लाखो भाविकांची मांदियाळी : राज्यासह परराज्यातील सर्वधर्मीय लाखो भाविक सैलानी बाबा यांच्या दर्गाला मनोभावे दर्शन घेण्यासाठी येतात. होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच 30 मार्चला सैलानी बाबांचा संदल काढण्यात येणार आहे. या दिवशी लाखो भाविकांची मांदियाळी सैलानीत दाखल होत असते. या दिवशी पिंपळगाव सराई येथील एका घरातून रात्री नऊ वाजता संदल मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. सुशोभित केलेल्या उंटणीवरून ही संदल मिरवणूक निघणार आहे. अंगात येणं, भुतानं झपाटणं, करणी करणं आदी व्याधींचा येथे इलाज होतो, अशी धारणा मनी बाळगून हजारो नातेवाईक, मनोरुग्णांना होळीच्या दिवशी या ठिकाणी घेऊन येतात.
नारळांची आगळीवेगळी होळी : अनेक भाविक महामंडळाच्या बसेसने तर अनेक कुटुंब आपल्या खासगी वाहनाद्वारे सैलानीत दाखल होत आहेत. खऱ्या अर्थानं रविवारी (24 मार्च) होळीच्या सणापासून यात्रेला सुरुवात झाली आहे. विविध करमणुकीचे साधनं आणि विविध प्रकारची दुकाने यात्रेत थाटण्यात आली आहेत. आताच सैलानीत भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी उसळली असून, पुढील पंधरा ते वीस दिवस भाविकांचा येथे वेगळाच माहोल राहणार आहे. दरम्यान, रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळाची आगळीवेगळी होळी पेटवण्यात आली.