अमरावतीRepublican Party of India :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 'उगवता सूर्य' हा 1996 ते 2014 पर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रकाशमान पक्ष होता. दिवंगत नेते रा.सू. गवई यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं उगवता सूर्य हे चिन्ह होतं. खरंतर गवई गटाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची अमरावती जिल्ह्यात एकेकाळी जबरदस्त पकड होती. तसंच पक्षाचे प्रमुख रा.सू. गवई यांचा केंद्रीय राजकारणात मोठा दरारा होता. इयत्ता आठवी, नववीत असताना कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा पगडा असणारे रा.सू. गवई यांनी अमरावती शहरातील विदर्भ महाविद्यालयात शिक्षण घेतानाच राजकीय क्षेत्रात नाव लौकिक मिळवला. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विरोधात अमरावती लोकसभा मतदारसंघात 1962 मध्ये पहिल्यांदा शेड्युल कास्ट फेडरेशनचे उमेदवार म्हणून रा. सू. गवई यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती.
केंद्रीय राजकारणात गवईंचं वजन : अतिशय कमी मतांनी त्यांचा सन्मानजनक पराभव झाला होता. 1967 मध्ये देखील अतिशय अल्पमतानं काँग्रेसचे के. जी. देशमुख यांनी रा.सू. गवई यांचा पराभव केला होता. यानंतर सलग तीस वर्ष महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सदस्य, विरोधी पक्षनेता, उपसभापती, सभापती अशी अनेक पदं रा. सू. गवई यांनी भूषवलीत. पुढं 1996 नंतर गवईंनी केंद्रातील राजकारणात लक्ष द्याला सुरवात केली. तसंच त्यांनी केंद्रीय राजकारणात त्यांचं स्थान बळकट केलं. 2006 मध्ये त्यांनी बिहार, केरळचे राज्यपाल म्हणूनही काम केलंय. आजही अमरावती लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं उगवता सूर्य चिन्ह कार्यकर्त्यांच्या आठवणीत आहे. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना गवई गटाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा सूर्य नेमका कुठे बुडाला याबाबत 'ईटीव्ही भारत'नं खास आढावा घेण्याचा प्रयत्न केला.
रिपाइं गवई गटाचा थोडक्यात इतिहास :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 मध्ये मजूर पक्ष स्थापन केला होता. या पक्षाकडून ते मुंबई प्रांतात निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावानं पक्ष स्थापन करण्यासंदर्भात लिहिलेलं खुलं पत्र समोर आलं होतं. त्याच पत्राच्या आधारावर 3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी तामिळनाडू राज्यातील एन. शिवराज या पक्षाचे पहिले अध्यक्ष होते. 1962 ते 1972 असा दहा वर्षाचा सुवर्णकाळ या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लाभला. त्यावेळी देशभरात पक्षाचे 22 आमदार, 13 खासदार निवडून आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सुगीचा काळ असतानाच दुर्दैवानं अवघ्या दहा वर्षात पक्ष फुटीचं ग्रहण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वाट्याला आलं. यातूनच पुढं खोब्रागडे गट, कांबळे गट, असे विविध गट निर्माण झाले. याच काळात दलित पॅंथर तसंच मास मुव्हमेंट नावाच्या चळवळीमुळं देखील पक्षाचं विभाजन झालं.
1995 ला रिपाइं गटात ऐक्य :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये निर्माण झालेले विविध गट 1995 मध्ये एकत्र आले. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत रा. सू. गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले या चारही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात 11 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पहिल्यांदा उगवता सूर्य चिन्ह मिळालं होतं. त्यावेळी रा. सू. गवई पराभूत झाले असले, तरी त्यांना 1 लाख 60 हजार मतं मिळाली होती. एकूणच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व 11 उमेदवारांनी राज्यात एकूण 17 लाखाच्यावर मतं घेतली होती.
पवारांच्या माध्यमातून झाली काँग्रेसशी युती :1996 च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एक्याची ताकद ओळखून शरद पवार यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत काँग्रेसची युती करण्याचा प्रयत्न यशस्वी केला. काँग्रेससोबत झालेल्या युतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला राज्यात लोकसभेच्या चार जागा मिळाल्या. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत अमरावतीतून रा.सू. गवई पहिल्यांदाच निवडून आले. तसंच या निवडणुकीत जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांनी देखील बाजी मारली होती.
...तर टिकलं असतं वाजपेयी सरकार :1998 च्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पहिल्यांदाच केंद्रात स्थान मिळालं होतं. पक्षाच्या चार खासदारांच्या गटाचे प्रमुख रा.सू. गवई होते. त्यावेळी अल्पमतात असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार टिकण्यासाठी केवळ दोन मतांची गरज होती. त्यावेळी भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांनी रा.सू. गवई यांना आपल्या गटाचा पाठिंबा अटल बिहारी वाजपेयींना देण्यासाठी फार प्रयत्न केला होता. वाजपेयी माझे मित्र असले, तरी माझ्या मतदारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास तोडणार नाही. माझ्या तत्त्वांशी मी बांधील असल्यामुळं वाजपेयींना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका रा.सू. गवई यांनी स्पष्ट केली होती. जर त्यावेळी रा.सू. गवई यांनी आपल्या तत्त्वांना बाजूला सारलं असतं, तर वाजपेयी सरकार अवघ्या 13 महिन्यात न कोसळता टिकलं असतं. तसंच रा.सू. गवई यांना केंद्रात मंत्रिपद देखील मिळालं असतं, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
2008-09 मध्ये राजेंद्र गवईंची एंट्री :रा.सू. गवई यांच्यावर 2006 मध्ये केरळ, बिहारचे राज्यपाल म्हणून नवी जबाबदारी आली. अमरावतीच्या राजकारणात 2008 मध्ये पहिल्यांदाच मुंबईवरून रा.सू. गवई यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई अमरावतीत आले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीची डॉ. राजेंद्र गवई यांनी जोरदार तयारी केली होती. त्या निवडणुकीत पहिल्यांदाच अमरावती बाहेरून आलेले शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात राजेंद्र गवई यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला तगडी लढत दिली. त्यावेळी 54 हजार मतांनी डॉ. राजेंद्र गवई यांचा पराभव झाला होता. त्यांना एकूण 2 लाख 54 हजार इतकी मतं मिळाली होती.