महाराष्ट्र

maharashtra

तुम्ही पाहिला आहे का कधी हनुमान मंदिरात नंदी? या मंदिरातील मूर्तीला आहे 900 वर्षांचा इतिहास - Nandi Bull Statue In Hanuman Temple

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 1:31 PM IST

Updated : Jul 31, 2024, 4:50 PM IST

Nandi Bull Statue In Hanuman Temple : महादेव मंदिरात पिंडीपुढे नंदी विराजमान असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र अमरावतीतील महिमापूर गावात हनुमान मंदिरात नंदी आढळून आला आहे. इथल्या ऐतिहासिक हनुमान मंदिरात नंदी विराजमान असल्याची ही पहिलीच घटना असावी असा दावा ग्रामस्थ करत आहेत.

Nandi Bull Statue In Hanuman Temple
हनुमान मंदिरात विराजमान नंदी (Reporter)

तुम्ही पाहिला आहे का कधी हनुमान मंदिरात नंदी (Reporter)

अमरावती Nandi Bull Statue In Hanuman Temple : महादेवाचं मंदिर म्हटलं की मंदिरातील शिवलिंगासमोर नंदी हमखास असतोच. मात्र अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात येणाऱ्या महिमापूर या गावात चक्क हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या मूर्तीच्या अगदी समोर नंदी विराजमान आहे. एकाच दगडात सुबक कलाकृतीद्वारे घडवण्यात आलेला हा नंदी सुमारे 900 वर्षांपूर्वी महिमापूर इथं बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पाय विहिरीत गावकऱ्यांना खोदकामादरम्यान सापडला. गावातील अतिशय जुन्या अशा हनुमान मंदिरात अगदी हनुमंताच्या गाभाऱ्यासमोर हा चार फूट लांब आणि तीन फूट उंच असा भला मोठा नंदी ठेवण्यात करण्यात आला. हनुमानाच्या मंदिरात चक्क नंदी असणारं कदाचित महिमापूरचं हे हनुमान मंदिर एकमेव असावं. हनुमान मंदिरातील या नंदीचा नेमका इतिहास उलगडण्याचा' ईटीव्ही भारत' नं प्रयत्न केला.

Nandi Bull Statue In Hanuman Temple (Reporter)

ऐतिहासिक पाय विहिरीत सापडला नंदी :महिमापूर या गावाच्या मध्यभागात भलीमोठी पाय विहीर आहे. ही पाय विहीर यादवकालीन किंवा बहामणीकालीन असावी, असे दोन मतप्रवाह आहेत. या विहिरीचं संपूर्ण बांधकाम हे तांबूस रंगाच्या दगडात आहे. चौकोनी आकाराची ही विहीर 80 फूट खोल असून विहिरीची रुंदी 400 मीटर इतकी आहे. तळघरात जसा किल्ला बांधला असावा, असा थाट या विहिरीचा पाहायला मिळतो. तळघरात अनेक मजले या विहिरीला आहेत. विहिरीत उतरण्यासाठी 88 पायऱ्या असून या पायऱ्या उतरताना एखाद्या किल्ल्यात आपण प्रवेश करत आहोत, असा अनुभव येतो. विहिरीच्या प्रवेशद्वारांवर दगडात कोरलेली दोन फुलं ही सर्वांचं लक्ष वेधतात. पायऱ्यांद्वारे विहिरीत खाली उतरताना विश्रांतीसाठी काही टप्पे दिले आहेत. या विहिरीत चारही बाजूनं फिरता येईल, बसता येईल, अशी व्यवस्था आहे. या ऐतिहासिक विहिरीतून शिवलिंग सापडलं. एकाच दगडात घडवण्यात आलेला भला मोठा नंदी देखील याच पाय विहीरमधून बाहेर काढण्यात आला.

अशी आहे नंदी बैलाची मूर्ती : "महिमापूर इथल्या ऐतिहासिक विहिरीत आढळलेली नंदी बैलाची मूर्ती जेव्हा बाहेर काढण्यात आली, त्यावेळी एकाच काळ्या दगडात घडवण्यात आलेल्या नंदीचं तोंड, शिंग आणि शेपूट खंडित केलं असल्याचं आढळून आलं. ग्रामस्थांनी या नंदीचं तोंड शिंग आणि शेपूट पुन्हा व्यवस्थित केलं. त्यावेळी मंदिराच्या अगदी शेजारीच हनुमानाच्या जुन्या मंदिरात या नंदीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या नंदीबैलाचं वैशिष्ट्य म्हणजे पोळ्याला ज्याप्रमाणे बैलाला सजवलं जातं, अगदी तसंच या नंदीला विविध आभूषणांनी सजवण्यात आलं आहे. अगदी खरा जिवंत नंदी असा भास हनुमानाच्या मंदिरातील या नंदीला पाहून होतो. काळ्या दगडात घडवण्यात आलेल्या या नंदीला ग्रामस्थांनी रंगरंगोटी केली. हनुमानाच्या मंदिरात असणारा हा नंदी पाहण्यासाठी अनेकजण येतात," अशी माहिती महिमापूर येथील रहिवासी तुळशीदास काळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. या ठिकाणी विहिरीत छोट्या आकाराची पिंड देखील सापडली, ती मंदिराच्या बाहेर ठेवण्यात आली, असं तुळशीदास काळे यांनी सांगितलं.

चोळ काळातला नंदी असल्याचा अंदाज : "इ. स. दहाव्या शतकात भारताच्या दक्षिणेकडं चोळांचं राज्य होतं. चोळांच्या राज्यात शिवलिंग पूजेचं महत्त्व वाढलं आणि अनेक भागात शिवालय उभारण्यात आली. शिवलिंगासमोर नंदीची स्थापना देखील प्रत्येक शिवालयात करण्यात आली. महिमापूर या ठिकाणी देखील चोळांनी असंच शिव मंदिर उभारलं. पुढं यादवांच्या काळात देखील हे मंदिर सुरक्षित होतं. चौदाव्या शतकात बहामनी साम्राज्यात देखील हिंदूंच्या मंदिरांचं नुकसान झालं नाही. मात्र चौदाव्या शतकानंतर उत्तरेकडून मुस्लिमांचं आक्रमण वाढलं आणि या काळात अनेक मंदिरं नष्ट करण्यात आली. त्याच काळात महिमापूरच्या शिवालयातील शिवलिंग आणि नंदी या ऐतिहासिक विहिरीमध्ये विसर्जित करण्यात आले, किंवा लपवण्यात आले असावे," असा अंदाज इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ वैभव मस्के यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. महिमापूर इथं खोदकाम करण्यात आलं, तर या भागात अनेक ऐतिहासिक वस्तू, मूर्ती आढळून येतील असंही प्रा. डॉ. वैभव म्हस्के म्हणाले.

ऐतिहासिक पाय विहिरीची सुरू आहे डागडुजी :महिमापूर इथल्या ऐतिहासिक पाय विहिरीची भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीनं डागडुजी केली जात आहे. ही पाय विहीर आता दोन वर्षांसाठी बंद करण्यात आली आहे. या विहिरीचं ज्या प्रकारे बांधकाम आहे, अगदी त्याच स्वरूपात तिचं जतन व्हावं, या दृष्टीनं पुरातत्व विभागाच्या वतीनं खबरदारी घेतली जात आहे. या पाय विहिरीच्या डागडुजीसाठी पाय विहिरीला पूर्वी असणाऱ्या विशिष्ट विटा आणि दगड मध्यप्रदेशातून आणण्यात आले आहेत.

Last Updated : Jul 31, 2024, 4:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details