महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐतिहासिक बाणगंगा तलाव ठरणार मुंबईचं मुख्य आकर्षण, महानगरपालिका प्रशासनाचा हा आहे 'ड्रीम प्रोजेक्ट' - Historical Banganga Lake

Historical Banganga Lake : मुंबईतील ऐतिहासिक तलाव म्हणून बाणगंगा तलाव हा पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. आता मुंबई महापालिकेनं बाणगंगा तलावाच्या पुनर्विकासाचा ड्रीम प्रोजेक्ट हाती घेतला.

Historical Banganga Lake
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 1:20 PM IST

मुंबई Historical Banganga Lake : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत दररोज हजारो पर्यटक भेट देतात. गेटवे ऑफ इंडिया, संजय गांधी बोरीवली राष्ट्रीय उद्यान, वीर राणी जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय, हॉटेल ताज, मरीन ड्राईव्ह यांसह अनेक ठिकाण पर्यटकांची पसंतीची आहेत. मात्र, या इतक्याच ओळखीत मर्यादित राहून चालणार नाही. मुंबई हे एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराला अनेक शतकांचा इतिहास आहे. इथं शेकडो वर्ष जुनी मंदिर आहेत. ऐतिहासिक किल्ले आहेत. याला जोडूनच एक ऐतिहासिक तलाव देखील आहे, त्याचं नाव बाणगंगा तलाव. मुंबईतील हा तलाव पांडवकालीन असल्याचं बोललं जाते. आता या तलावाचा पुनर्विकास करून हा तलाव मुंबईच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक ठरेल, असा विश्वास महापालिकेनं व्यक्त केला. या तलावाच्या पुनर्विकासाचा 'ड्रीम प्रोजेक्ट' आता महापालिका प्रशासनानं हाती घेतला आहे.

बाणगंगा तलाव

बाणगंगा तलाव ऐतिहासिक वारसा :मुंबईतील ऐतिहासिक वारसा ठिकाणांपैकी एक म्हणजे बाणगंगा तलाव आणि त्यालगतचा परिसर. वाळकेश्वर मलबार हिल परिसरात हा तलाव आहे. महाराष्ट्र प्राचीन स्मारकं आणि पुराणवास्तू शास्त्रविषयक स्थळं, अवशेष अधिनियम, 1960 अन्वये बाणगंगा तलाव महाराष्ट्र शासनानं संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. या तलावाभोवती मंदिरं, समाधी, धर्मशाळा, मठ असून हे स्थान राष्ट्रीय महत्व असलेलं सांस्कृतिक केंद्र आहे. तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदीर, सिद्धेश्वर शंकर मंदीर, राम मंदीर, बजरंग आखाडा, वाळूकेश्वर मंदीर इत्यादी प्रसिद्ध मंदिरं आहेत. पुरातन काळापासून बाणगंगा तलावास धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या तलावाचे प्राचीनकालीन महत्व लक्षात घेता देशविदेशातील पर्यटक हजारोंच्या संख्येनं इथं भेट देतात.

बाणगंगा तलाव

ऐतिहासिक तलावाला प्रदूषण अतिक्रमणाचा विळखा :या ऐतिहासिक तलावाला मागील काही वर्षापासून प्रदूषण, अतिक्रमण, गर्दुले यांनी वेढलं होतं. त्यामुळे बाणगंगा तलावाचं ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि प्राचीनकालीन महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनानं 15 नोव्हेंबर 2022 रोजी बाणगंगा तलाव परिसर क्षेत्रास 'ब' वर्ग पर्यटनस्थळ घोषित केलं. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीविकरणाचं काम हाती घेतलं. पहिल्या टप्प्यात तलाव परिसरातील ऐतिहासिक 16 दीपस्तंभांचं पुनरुज्जीवन दृष्टिपथात आहे. याशिवाय, तलावातील दगडी पायऱ्यांची दुरुस्ती आणि सुधारणा, तलावाच्या सभोवती असणारा वर्तुळाकार रस्ता 'भक्ती परिक्रमा मार्ग' म्हणून विकसित करणं, मंजूर रस्ता रेषा असलेली 18.30 मीटर रुंद अशी बाणगंगा तलावाकडं जाणारी 'मिसिंग लिंक' विकसित करणं, तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटविणं, अशा प्रमुख कामांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेनं दिली आहे.

अकराव्या शतकाच्या पौराणिक संदर्भात तलावाच्या पाऊलखुणा :यासंदर्भात माहिती देताना डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितलं की, "बाणगंगा तलावाचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे. अकराव्या शतकाच्या पौराणिक संदर्भांमध्ये या तलावाच्या पाऊलखुणा आढळून येतात. या भागात विविध देवीदेवतांची मंदिरं, रामकुंड आदी धार्मिक स्थळंही आहेत. पहिल्या टप्प्यात तलाव प्रवेश पायऱ्यांवरील 13 झोपड्या काढण्यात आल्या आणि त्यातील राहिवाश्यांचं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नजीकच्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आलं. विशेष म्हणजे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाला कोणतीही नुकसानभरपाई द्यावी लागली नाही. येथील दीपस्तंभांचं पुनरुज्जीवन करताना त्यांच्या वास्तविकतेला कोणतीही हानी पोहोचू नये आणि त्यांचं तत्कालीन रूप आहे त्या स्थितीतच दिसावं, या अनुषंगानं त्याकाळी वापरण्यात आलेल्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये उडीद डाळ, मेथी, जवस, गूळ, बेलफळ यांच्यापासून तयार करण्यात आलेल्या मिश्रणाचा समावेश आहे. तलावातील गाळ काढताना तलावाच्या तळाशी तसेच आसपास असलेल्या पुरातन दगडांची हानी होऊ नये, यासाठी पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली कुशल मनुष्यबळाच्या साहाय्यानं गाळ काढला जात आहे."

असं करण्यात येणार आहे काम :बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाची कामं तीन टप्प्यात करण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा, तलाव परिसरातील दीपस्तंभांची पुर्नउभारणी, आकर्षक विद्युत रोशणाई, तलावाच्या सभोवती असलेला वर्तुळाकार रस्ता 'भक्ती मार्ग' म्हणून विकसित करणं, मंजूर रस्ता रेषा असलेली 18.30 मीटर रुंद अशी बाणगंगा तलावाकडं जाणारी 'मिसिंग लिंक' विकसित करणं, तलावाच्या दगडी पायऱ्यावरील अतिक्रमण हटवणं, इत्यादी कामं करण्यात येणार आहेत.

ऐतिहासिक रामकुंडाचं होणार पुनरुज्जीवन :दुसऱ्या टप्प्यात बाणगंगा तलावातून दिसणाऱ्या इमारतींचा दर्शनी भाग एकसमान पद्धतीनं रंगरंगोटी करणं, तलावास लागून असलेल्या इमारतींच्या भिंतींवर भित्तिचित्रे चितारणं आणि शिल्पं घडविणं, रामकुंड या ऐतिहासिक आणि पवित्र स्थळाचं पुनरुज्जीवन, तलाव परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करुन योजनाबद्ध पद्धतीनं रूपरेषा ठरवणं आणि बाणगंगा तलावाकडं जाण्यासाठी असलेल्या दगडी पायऱ्यांची व रस्त्यांची सुधारणा इत्यादी कामांचा समावेश आहे.

बाणगंगा तलाव ते अरबी समुद्र होणार मार्गिका :तिसऱ्या टप्प्यात बाणगंगा तलाव ते अरबी समुद्र या दरम्यान विस्तृत मार्गिका बनवण्यात येणार आहे. सदर जागेत असलेल्या झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन करून त्याठिकाणी वाराणसीच्या धर्तीवर उद्यानं, खुली बैठक व्यवस्था, सार्वजनिक जागा निर्माण करणं, डॉ. भगवानलाल इंद्रजीत मार्गाचं रुंदीकरण करणं आणि रस्ता रेषेत बाधित निवासी-अनिवासी बांधकामांचं पुनर्वसन आदी कामं केली जाणार आहेत. या कामासाठी 15 कोटींचा एकूण खर्च येणार असून, यात राज्य सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि जीएसबी सेवा ट्रस्ट या तिघांमध्ये हा खर्च वाटून घेण्यात आला आहे. यात बृहन्मुंबई महानगरपालिका सहा कोटींची कामं करणार आहे.

हेही वाचा :

  1. Many Fish Dead in Banganga pond : बाणगंगा तलावात 22 क्विंटल माशांचा मृत्यू
  2. बाणगंगामध्ये ऋषी कपूर यांच्या अस्थींचे विसर्जन

ABOUT THE AUTHOR

...view details