पालघर :खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत निवडून आल्यापासून सातत्याने पाठपुरावा सुरू केलाय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची वारंवार भेट घेऊन ते अनेक प्रश्न मांडत आहेत आणि ते सोडवण्यासाठी काय करावं लागेल याच्या सूचनाही देत आहेत. आज रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी वसई-विरारमधील दोन रेल्वे उड्डाणपुलांचे प्रश्न त्याच्यासमोर मांडले आणि ते सोडवणं किती आवश्यक आहे हेही त्यांना पटवून दिलं. वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान अलकापुरी येथे उड्डाणपूल तसंच विरार आणि नालासोपारा तालुक्याच्या दरम्यान ओस्तवाल नगरी येथे उड्डाणपूल अशा दोन उड्डाणपुलांचा प्रश्न सवरा यांनी हेमंत सवरा यांच्यासमोर मांडला.
तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण परंतु..: या दोन रेल्वे उड्डाणपुलांची ‘जिओ टेक्निकल’ तपासणी पूर्ण झाली आहे. रेल्वे मार्गदर्शक तत्त्वानुसार सामान्य व्यवस्था रेखाटन तयार करण्यात आलं आहे. असं असूनही या उड्डाणपुलांच्या मंजुरीचा आणि निधीचा प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. हा प्रस्ताव तातडीनं मंजूर करावा, असं साकडं खासदार सवरा यांनी रेल्वेमंत्र्यांना घातलं. यावेळी नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांचं या प्रश्नाबाबतचं निवेदनही रेल्वेमंत्र्यांना देण्यात आलं.
उड्डाणपूल झाल्यास मोकळा श्वास : हे दोन उड्डाणपूल झाल्यास स्थानिक प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. त्याचबरोबर अपघाताचं प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त करताना पालघर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हे दोन उड्डाणपूल अतिशय महत्त्वाचे असल्याचं सावरा यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितलं.