कोल्हापूर Gokul Annual General Meeting :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या म्हणजेच गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेत्या शौमिका महाडिक सभेच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशावरून पोलिसांसोबत जोरदार वादावादी झाली. यावेळी महाडिक समर्थक आणि सत्ताधारी समर्थक आमनेसामने आल्यानं मोठा गोंधळ उडाला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या गोंधळातच गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न : "कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. गोकुळ दूध संघावर सत्ता असलेल्या नेत्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला आमचा विरोध आहे. या सोबतच उत्पादकांकडून दररोज किमान 50 लीटर ही अट रद्द करण्यास विरोध आहे. संस्था वाढवल्या पण त्याप्रमाणे दूध संकलन वाढलं नाही. ही अट रद्द करून तुम्ही बोगस मतदार तयार करत आहात," असा आरोप करत शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
50 लिटर दुधाची अट रद्द केली जाणार :"50 लिटर दुधाची अट रद्द केली जाणार आहे. दूध संघ मल्टीस्टेटचा निर्णय घेणाऱ्यांनी आमच्यावर खासगीकरणाचा आरोप करू नये. गोकुळ दूध संघाच्या सभासदांनी तुम्हाला व्यासपीठावर बसून प्रश्न विचारण्याची संधी दिली आहे. मात्र, तुम्ही व्यासपीठाच्या समोरून प्रश्न विचारता यामुळं तुमच्या डोक्यात वेगळंच काहीतरी आहे, असं गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी सांगितलं. "सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.