प्रणिती शिंदेंच्या प्रश्नावर बोलताना मंत्री तानाजी सावंत सोलापूर Health Minister Tanaji Sawant : ''काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर जिल्हा रुग्णालय कोणत्या खात्याचं आहे? हे माहीत नव्हतं. त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्याला एखादा राजकीय प्रश्न विचारायचा होता म्हणून विचारला. (Solapur District Hospital) त्यांना इथली सत्यस्थिती माहीत नसून त्या गोंधळल्या आहेत. सोलापूर जिल्हा रुग्णालय कुणाचं आणि सिव्हिल हॉस्पिटल कुणाचं, याविषयी त्यांना ठाऊक नाही. सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल हे मेडिकल कॉलेजचं आहे'', असं उत्तर सावंतांनी दिलय.
महिना उलटूनही रुग्णालयाचं सुरूच झालं नाही :सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयाबाबत हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एक महिन्याच्या आत रुग्णालय सुरू होईल, असं उत्तर दिलं होतं. सध्या एक महिना उलटून गेला असला तरीही जिल्हा रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालय सुरू झालेलं नाही. आज (10 फेब्रुवारी) आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयाची पाहणी करून 29 फेब्रुवारी पर्यंत ते सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.
आरोग्य मंत्र्याचा पाहणी दौरा :यावेळी तानाजी सावंत म्हणाले की, जवळपास तीन ते चार वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाचं कामकाज सुरू होतं. ते अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या 29 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा रुग्णालय सुरू होईल. सोलापूर शहरातील एका खासगी कार्यक्रमासाठी ते आले होते. तो कार्यक्रम उरकून त्यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन पाहणी केली. आरोग्य मंत्री येणार असल्यानं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची कानउघडणी :तानाजी सावंत यांच्या रुग्णालय निरीक्षण प्रसंगी दंत चिकित्सक डॉ. वायचळ, जिल्हा रुग्णालयाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पीडब्ल्यूडी विभागाचे प्रतिनिधी आणि जिल्हा रुग्णालयाची इमारत बांधणाऱ्या कंत्राटदारानेही हजेरी लावली. सावंतांनी पाहणी दरम्यान इमारतीत अनेक चुका असल्याचं निदर्शनास आणून दिलं. तसंच त्यांनी पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत ''तुम्ही आरोग्य खात्याला रुग्णालयाची इमारत कशी काय सोपवली? असा प्रश्न विचारला. शिवाय त्याची दुरुस्ती करून देण्याच्या सूचनाही केल्या.
हेही वाचा:
- राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून उद्धव ठाकरेंची बोचरी टीका, आता फडणवीसांनीही दिलं सणसणीत उत्तर
- महाराष्ट्र राज्य 'गांx' च्या हातात गेल्यानं गुंड फोफावले; संजय राऊतांची भाजपावर जहरी टीका
- फारुकी फर्मान बघताच राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, म्हणाले...