पुणे-जिल्ह्याबरोबरच राज्यात मोठ्या प्रमाणावर अनेक शेतकरी हे टोमॅटोची शेती करताना पाहायला मिळतात. खरं तर टोमॅटोला जास्त बाजारभाव असल्यानं याच टोमॅटोमधून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं उत्पन्नदेखील मिळतं. आजपर्यंत आपण एकाच प्रकारचे टोमॅटो पाहिले असतील, मात्र आज आपण गावरान पद्धतीनं पिकवलेले 20 हून अधिक प्रकारचे टोमॅटो पाहणार आहोत. तसेच आपण लाल अन् हिरव्या रंगाची मिरची पाहिलीच असेल, परंतु आज आपण काळ्या रंगाची तीही तिखट मिरची पाहणार आहोत.
20 हून अधिक प्रकारच्या टोमॅटोची लागवड :बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रामधील ‘कृषिक 2025’ कृषी प्रदर्शनात कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गावरान 20 हून अधिक प्रकारच्या टोमॅटोची लागवड करण्यात आलीय. तसेच इथं मिरचीचीसुद्धा लागवड करण्यात आली असून, यात काळ्या मिरचीचासुद्धा समावेश आहे, याबाबत माहिती घेण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यासंदर्भात कृषी विज्ञान केंद्राचे विद्यार्थी म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने 20 हून अधिक प्रकारच्या गावरान टोमॅटोची लागवड इथं करण्यात आलीय. जे पूर्णपणे गावरान आहेत. ज्यात स्ट्रॉबेरी टोमॅटो, चेरी टोमॅटो, ब्लॅक टोमॅटो, ॲपल टोमॅटो, यल्लो चेरी टोमॅटो, चक्री टोमॅटो अशा विविध प्रकारच्या टोमॅटोचा समावेश आहे. या टोमॅटोमध्ये जास्तीत जास्त पोषण तत्त्वे असतात, तसेच हे वाण विलुप्त झालेलं आहे. भारतभर 3 लाख किलोमीटर फिरून हे टोमॅटो इथं लावण्यात आलेत. तसेच हे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढण्यास मदत होते आणि शेतकऱ्यांनी हे जर टोमॅटो लावले, तर बाजारात याला चांगली मागणी मिळू शकते, अशी माहितीही या विद्यार्थ्यांनी दिलीय.
सर्वात तिखट काळी मिरची :कृषी विज्ञान केंद्राच्या प्लॉटवर मिरची शेती करत प्रात्यक्षिके दाखविण्यात आलीत. ज्यात हिरवी मिरचीबरोबर असलेली काळी मिरची, हिरवी आणि लाल मिरची यांच्यापेक्षा तिखट असून, मिरचीचे प्रकार पाहण्यासाठी नागरिक गर्दी करताना पाहायला मिळतेय. याबाबत कृषी विज्ञान केंद्राच्या विद्यार्थिनीने सांगितलं की, आजपर्यंत आपण हिरवी आणि लाल मिरची बघितली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने पहिल्यांदा काळी मिरचीची लागवड करण्यात आलीय. आतापर्यंत सर्वात तिखट मिरची म्हणून लवंगी मिरचीची ओळख होती, पण त्यापेक्षाही दोन ते तीन पटीनं ही काळी मिरची तिखट आहे. ही मिरची एवढी तिखट आहे की, जर आपण मसाल्यात 4 किलो लाल मिरची वापरत असू आणि ही जर एक किलो वापरली तरी तेवढा तिखटपणा आपल्याला पाहायला मिळतो.
मिरचीवर कीटकांचा प्रादुर्भाव कमी : मिरचीवर जास्त प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव होतो. मात्र या मिरचीवर याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. याची विशेष बाब म्हणजे ही मिरची कवळी असताना हिरवीच असते आणि नंतर ती काळी होत जाते. या मिरचीला लोकलच नव्हे तर हैदराबाद तसेच बंगलोर या ठिकाणी जास्त मागणी आहे, असं यावेळी विद्यार्थ्यांनी म्हटलंय. या काळी मिरचीच्या दोन रोपांमधील अंतर हे 45 सेंटीमीटर ठेवायचं असते आणि दोन लाईनमधील अंतर हे दीड फूट कॉमन असलं पाहिजे. तसेच याच्यातदेखील जर दुसरं पीक लावायचं असेल तेदेखील लावू शकतो. अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी या काळी मिरचीची लागवड केली तर त्याला जास्त फायदा होऊ शकतो, असंदेखील या विद्यार्थ्यांनी सांगितलंय.
हेही वाचाः