Hathras Stampede : हाथरसमध्ये एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्यामुळं 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. सत्संग कार्यक्रम करणारे भोले बाबा कोण आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भोले बाबा म्हणून ओळखले जाणारे हे बाबा चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या सत्संग कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती असते.
चेंगराचेंगरी कशी झाली?भोले बाबांच्या सत्संगाचे आयोजन हाथरस येथे केलं होतं. सत्संगात मोठ्या प्रमाणात भाविक जमा झाले होते. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सर्वात जास्त महिला आणि लहान मुले आहेत. या चेंगराचेंगरीत जवळपास 150 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या सत्संगामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. सत्संगमध्ये अंदाजापेक्षा जास्त भाविक सहभागी झाले होते.
कोण आहेत हे भोले बाबा?बाबा मूळचे कासगंज जिल्ह्यातील बहादुरनगर, पटियाली येथील आहे. त्यांचं नाव साकार विश्व हरी आहे. बाबा होण्यापूर्वी ते पोलिसांच्या गुप्तचर विभागात काम करायचे. पुढे त्यांनी नोकरी सोडून धार्मिक प्रवचन देण्यास सुरुवात केली. भोले बाबा हे आपल्या पत्नीसह आसनावर बसून सत्संग देतात. त्यांच्या सत्संगाला हजारो लोक येतात.
- कोरोनाच्या काळात बाबा आले चर्चेत : कोरोनाच्या काळातही भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम वादात सापडला होता. त्यांनी त्यांच्या सत्संगात फक्त 50 जणांना येण्याची परवानगी मागितली होती. पण त्यांच्या सत्संगाला 50 हजारांहून अधिक लोक आले. प्रचंड गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडली होती.
यूपी व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये भक्त : भोले बाबांनी एटा, आग्रा, मैनपुरी, शाहजहांपूर, हाथरस यासह अनेक जिल्ह्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. याशिवाय मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि हरियाणा लगतच्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांची मंडळं आहेत. भोले बाबांचे बहुसंख्य भक्त गरीब वर्गातील असून लाखोंच्या संख्येने सत्संग ऐकण्यासाठी येतात. साकार विश्व हरी स्वतःला भगवंताचा सेवक म्हणतात. परंतु त्यांचे भक्त बाबांना भगवंताचा अवतार मानतात.
- सत्संगात पाणी वाटप : भोले बाबांच्या सत्संगाला जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला पाण्याचं वाटप केलं जातं. हे पाणी प्यायल्यानं त्यांची समस्या दूर होते, असे बाबांचे भक्त मानतात. पटियाली तहसीलच्या बहादूर नगर गावात असलेल्या त्यांच्या आश्रमातही बाबांचा दरबार भरतो. आश्रमाबाहेर एक हातपंपही आहे. दरबाराच्या वेळी या हातपंपाचं पाणी पिण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात.
-