नाशिकच्या हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा नाशिक Hanuman Jayanti 2024 : मंगळवारी देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. हनुमान जन्मस्थळ नाशिक येथील अंजनेरी देवस्थान येथे लाखो भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी सहा वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी हनुमानाचा जन्म सोहळा पार पडला. रामनवमीपासूनच इथे उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. यावेळी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मूर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले होते. आज दिवसभर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातून भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने अंजनेरीला दाखल होत असतात. यावेळी जय हनुमानाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमुन गेला होता. मंदिर ट्रस्टच्या वतीनं आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
हनुमानाचा जन्म झाला :हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला. यामुळं या डोंगराला अंजनेरी हे नाव पडलं. येथील डोंगरावर अंजनी मातेचं आणि हनुमानाचं मंदिरही आहे. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या लोकांच हे श्रद्धा स्थान आहे. पुराणात 14 वर्ष वनवास काळात राम-सीता-लक्ष्मण नाशिकमधल्या पंचवटी भागात राहात होते असा उल्लेख आहे. तर हनुमानाचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे, असा दावा नाशिकमधील लोकांचा आहे.
कुठे आहे अंजनेरी पर्वत : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत वसलेला गिरीदूर्ग प्रकारातील 4 हजार 200 फूट उंचीचा 'अंजनेरी गड' अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून परिचित आहे. अंजनेरी गडापर्यंत जाण्यासाठी नाशिकमधून अर्धा तास पुरेसा होतो. अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरी गावात पोहचल्यावर गडाची वाट धरता येते. गडाच्या निम्म्यापर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनाने सहज जाणे शक्य आहे. दीड किलोमीटरची गडाची वाट वाहनाने पूर्ण करता येते. नाशिक वनविभागाच्या अखत्यारितीत असलेला अंजनेरी गड हा संपूर्णपणे राखीव वन संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. अंजनेरी गड चढाईच्या दृष्टीनं सोपा आहे. अंजनेरी गडावर पोहचल्यानंतर परिसरातील विहंगम नैसर्गिक दृश्य डोळ्यांची पारणं फेडतो. अंजनेरी गावात गडाच्या प्रारंभी बाल हनुमान आणि अंजनी मातेचं मंदिर आहे.
हेही वाचा -
- हनुमान जयंती 2024 : देशातील एकमेव गरुड हनुमंताची मूर्ती आहे नाशिकमध्ये, मूर्तीला अर्पण करतात कोकम सरबत, कैरी पन्ह अन् आंब्याचा रस - Hanuman Jayanti 2024
- हनुमान जयंती 2024 ; शिर्डीत 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा: इतक्याच तरुणांना उचलता आला 'बजरंग गोटा' - Hanuman Jayanti 2024
- देशभरात आज साजरी होतेय हनुमान जयंती,समर्थ रामदासांनी स्थापित केलेले अकरा मारुती कुठे आहेत? - Hanuman Jayanti 2024