पुणे Gulabo Gang Pune : चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. यानंतर अशा घटना राज्यात समोर आल्या. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. आता 'बेटिया फाऊंडेशन'तर्फे पुण्यातील महिला सुरक्षेसाठी 'गुलाबो गँग'ची सुरुवात करण्यात आली. त्यामुळं अशा नराधमांना तिथल्या तिथंच चोप देण्यात येणार आहे. याचं उद्घाटन बुधवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आलं.
'गुलाबो गँग'ची सुरुवात : पुणे तसेच राज्यात मागील काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पुण्यात देखील या घटना वाढत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. "महिला अत्याचाराबाबत फक्त बोलून काहीही होणार नाही, तर प्रत्यक्षात काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही शहरातील विविध भागातील मुली, महिलांना एकत्र करत 'गुलाबो गँग'ची सुरुवात करण्याचं ठरवलं आणि याची सुरुवात झाली," अशी माहिती 'बेटिया फाउंडेशन'च्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी दिली.
कराटे खेळण्याचं प्रशिक्षण : सध्या 'गुलाबो गँग'मध्ये पुणे शहरातील विविध भागातील 20 ते 25 मुली, महिला सहभागी झाल्या आहेत. या सर्व मुली, महिला कराटे खेळण्याचं प्रशिक्षण घेत आहेत. "शहरातील महाविद्यालय, शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी जिथं कुठं महिला अत्याचाराच्या घटना घडतील, तिथं आम्ही आमच्या गँगमधील महिलांना घेऊन जाणार. त्यानंतर तिथंच संबंधित व्यक्तीला चोप दिला जाईल. तसंच त्या नराधमाच्या घरी जावून आंदोलन करण्यात येईल," अशा शब्दात संगीता तिवारी यांनी महिलांकडं वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना इशारा दिलाय. अशा या गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळं 'गुलाबो गँग' तयार करुन संबंधितांना चोप देण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या.
नराधमांना धडा शिकवणार : "महिला अत्याचाराची एखादी घटना बघतो आणि त्यात जेव्हा आरोपीची सुटका केली जाते, तेव्हा ते बघून खूपच वाईट वाटतं. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळं आम्ही 'गुलाबो गँग'मध्ये सहभागी होत नराधमांना धडा शिकवणार आहेत. असा धडा शिकवू की तो पुन्हा तसा गुन्हा करणारच नाही," असा इशारा या गँगमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी नराधमांना दिला.