मुंबई- दिवाळी आणि छठ पूजा सणाच्या काळात 2024 मध्ये 7700 हून अधिक विशेष गाड्यांचे नियोजन केलंय, तसेच मागील वर्षाच्या तुलनेत या ट्रेनची संख्या ७३ टक्के अधिक आहे. 4 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय रेल्वेने प्रवासी सुविधेमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून, 3 कोटींहून अधिक प्रवाशांनी त्या दिवशी भारतीय रेल्वेने प्रवास केलाय. खरं तर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ही संख्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे ,अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली.
740 विशेष ट्रेन सेवांची घोषणा : दिवाळी आणि छठ पूजा सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने एकूण 740 विशेष ट्रेन सेवांची घोषणा केली होती. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि सुटसुटीत प्रवासाचा अनुभव मिळालाय. तसेच त्यात 507 विशेष ट्रेन सेवा दिली जात असून, त्यातील 233 सेवा आधीच पूर्ण झाल्यात. या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान, जनरल डब्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि अन्य प्रमुख शहरांमधून देशाच्या विविध स्थळांसाठी या गाड्या चालवण्यात येताहेत. सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांना सहजरीत्या प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने विविध सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्यात.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
- मुंबईतून ३६३ सेवा: २५२ सेवा पूर्ण, १११ सेवा उर्वरित.
- पुण्यातून ३२७ सेवा: २२१ सेवा पूर्ण, १०६ सेवा उर्वरित.
- नागपूर, लातूर, दौंड यांसारख्या ठिकाणांहून ५० सेवा: ३४ सेवा पूर्ण, १६ सेवा उर्वरित.
- उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५५१ सेवा: दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी व इतर ठिकाणी, त्यातील ३५६ सेवा पूर्ण, १९५ सेवा उर्वरित.
- दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ६४ सेवा: करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बेंगळुरू व इतर ठिकाणी, त्यातील ४४ सेवा पूर्ण, २० सेवा उर्वरित.
सणासुदीच्या काळात आरामदायी प्रवास: खरं तर या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन प्रवाशांसाठी सणासुदीच्या काळात आरामदायी प्रवासाच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरत असतात, त्यामुळेच त्यांनी वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचून आपल्या प्रियजनांसोबत दिवाळी आणि छठ पूजा साजरी केलीय. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, प्रत्येक स्थानकावर ‘मे आय हेल्प यू’ बूथ्स, तिकीट काऊंटरची वाढलेली संख्या, होल्डिंग क्षेत्रे, पिण्याचे पाणी, जेवण अन् शौचालय सुविधा पुरवण्यात आल्यात. प्रवाशांना त्वरित मदत मिळावी, यासाठी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी आणि तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आलेत.
हेही वाचा-