पालघरTrible Woman Bamboo Products : सेवा विवेक संस्थेच्यावतीनं या महिलांच्या प्रशिक्षणासाठी बिरसा मुंडा कार्यशाळा घेण्यात आली. त्यात या महिलांना बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू बनविण्याचे ४० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला आपल्या हस्तकौशल्याच्या बळावर बांबूपासून अतिशय आकर्षक, देखण्या आणि सुंदर वस्तू बनवायला लागल्या. या वस्तूंची विक्री केवळ पालघर जिल्ह्यातच नाही, तर थेट मुंबईपर्यंत पोहोचली आहे.
राज्यपालांकडून महिलांच्या कौशल्याची दखल : राज्यपाल रमेश बैस यांच्या कानावर या महिलांच्या कौशल्याची माहिती गेल्यानंतर त्यांनी स्वतः महिलांच्या कौशल्याचे कौतुक केले आणि राजभवनासाठीही काही वस्तू विकत घेतल्या. सेवा विवेक संस्थेने अतिशय गरीब परिस्थितीतील आदिवासी आणि दुर्गम भागातील महिलांची बांबूपासून वेगवेगळ्या दोनशे वस्तू बनवण्यासाठी निवड केली. कोरोनाच्या काळात महिलांच्या हाताला काम देण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम आता विस्तारला आहे.
बांबूपासून इमिटेशन ज्वेलरी : या महिलांनी बांबूपासून इमिटेशन ज्वेलरीसह अन्य वस्तू बनवल्या आहेत. बांबूपासून आकाश कंदील, सात प्रकारचे फ्रुट स्टॅन्ड, पाच प्रकारचे ट्रे, बांबू स्पीकर, व्हिजिटिंग स्टॅन्ड, पेन स्टँड, मोबाईल स्टॅन्ड, टी स्टॅन्ड, पेपर वेट, हॉटस्पॉट स्टॅन्ड, अगरबत्ती स्टॅन्ड, ज्वेलरी, फर्निचर, ट्रॉफी, की होल्डर, बुक होल्डर, राखी, परडी अशा सुमारे दोनशे प्रकारच्या वस्तू येथील आदिवासी महिला बनवतात. ऑनलाईन डिमांड वाढली: हस्तकौशल्य आणि कलेत गुंतवलेले मन यातून अतिशय सुंदर आणि आकर्षक वस्तू तयार होत असून आता या वस्तूंची मोहिनी जगाला पडली आहे. सेवा विवेक संस्था आता या वस्तूंची विक्री ऑनलाइन करीत आहे. या दोनशे वस्तूंच्या विक्रीतून अनेक निराधार, गरीब कुटुंबांना आधार मिळाला आहे. त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा स्तर उंचावला आहे.