नांदेड : "संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली त्यांची चौकशी सुरु आहे. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे." असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. दोन मर्सिडीज दिली की पद दिलं जायचं अशी टीका नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर केली होती. याबाबत त्यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की, "नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या ते माहिती नाही"
उद्धव ठाकरे असंच बोलत राहतात, त्यांच्या काळातील हजार बाबी आमच्याकडे : "उद्धव ठाकरे आता असंच बोलत राहतात. त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील हजार बाबी आमच्याकडं आहेत. पण आम्हाला बहुमत मिळालं आहे. आम्ही जी वचनं लोकांना दिली आहेत. ती पूर्ण करण्याच काम आम्ही करतोय" अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली. माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचे रक्षण करणे हे हिंदुत्व आहे का? या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
छत्रपती संभाजीनगरचं विभाजन करून एक विभागीय आयुक्तालय असलं पाहिजं : "मराठवाड्याला न्याय द्यायचा असेल तर, एक विभागीय आयुक्त कार्यालय व्हायला पाहिजे. नांदेड आणि लातूरच्या लोक प्रतिनिधींशी बोलून सर्व बाबी पाहून निर्णय घेऊ. याबाबत लवकरच निर्णय होईल" असं महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं