मुंबई - कुर्ल्यात बस अपघातात 7 निष्पाप लोकांचा बळी गेलाय. कुर्ल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी सीएसएमटी इथेही बस अपघातात एकाचा मृत्यू झालाय. सोमवारी 9 डिसेंबर रोजी कुर्ल्यातील एलबीएस रोडवर एका इलेक्ट्रिक बसने कित्येक जणांना फरफटत नेले असून, यात मोठी दुर्घटना घडलीय. त्यात 7 जणांचा मृत्यू झाला तर कित्येक जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बस अपघातानंतर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. तसेच जखमींवर सरकारकडून उपचार केले जातील, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र सरकारी मदत ही कागदावरच राहिली आहे. अजूनही जखमी रुग्णांवर उपचार हे त्यांच्याच कुटुंबाच्या खर्चातून होत आहेत. कोणतीही सरकारी मदत, बेस्ट प्रशासन किंवा पालिकेची मदत पोहोचली नसल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गटाचे) कलिना मतदारसंघाचे आमदार संजय पोतनीस यांनी केलाय.
चालकांना प्रशिक्षण दिले पाहिजे :पुढे बोलताना आमदार संजय पोतनीस म्हणाले की, जो चालक होता, तो नऊ दिवसांपूर्वी कामावर रुजू झाला होता. त्याला साध्या बस चालवण्याचा अनुभव होता. मात्र इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे हा एवढा मोठा अपघात झाला, पण आता बेस्ट प्रशासनाने इथून पुढे जे चालक-वाहक असतील, त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यानंतरच त्यांना कामावरती घेतले पाहिजे, अशी मागणी आमदार संजय पोतनीस यांनी केलीय. मुंबईतील सर्वात अरुंद रस्ता म्हणजे कुर्ला एलबीएस हा परिसर आहे. येथे नेहमी हा रस्ता बिझी असतो. इथे मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे फेरीवाले आहेत. त्यामुळे येथे जे अनाधिकृत फेरीवाले आहेत, त्यांना हटवण्याची गरज आहे. अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याच्या मी सूचना पालिका प्रशासनाला दिल्यात, असं संजय पोतनीस म्हणालेत.
5 लाखांची मदत कागदावरच :अपघात झाल्यानंतर येथे 7 जणांना जीव गमवावा लागलाय, तर कित्येक जण गंभीर जखमी आहेत. ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची सरकारी मदत जाहीर केली होती. परंतु ही मदत अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही. तसेच जखमींच्या उपचारासाठी सुद्धा संपूर्ण सरकारी मदत केली जाणार, असं शासनाने म्हटलं होतं. परंतु आतापर्यंत कुठलीही सरकारी मदत रुग्णांपर्यंत पोहोचली नाही. उलट रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून उपचार घ्यावे लागत आहेत. या अपघातातून सावरण्याऐवजी रुग्ण या उपचारामुळं कर्जबाजारी होतील, अशी भीती संजय पोतनीस यांनी व्यक्त केलीय. तसेच हा अपघात एवढा भीषण आहे की, जर योग्य उपचार झाले नाही, तर जखमी व्यक्तीला कायमचं अपंगत्व येण्याचीही शक्यता आहे. भविष्यात ते काम करू शकतील की नाही, याचीही शाश्वती नाही. त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेऊन त्वरित त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचवली पाहिजे, असंही आमदार संजय पोतनीस म्हणालेत.