सातारा -कास परिसरातील एका हॉटेलमध्ये कुख्यात गुंडांची रविवारी (८ डिसेंबर) पार्टी झाली. पुण्यातील बारबालांना नाचवून दारूच्या नशेत ग्राहकांच्या डोक्यात या पार्टीतल्या काही जणांनी बाटल्या फोडल्या. तसंच हॉटेलचीही तोडफोड करण्यात आली. हा सर्व प्रकार चार दिवसांनी उजेडात आल्यानंतर पाच जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
राडा करणाऱ्या संशयितांवर गुन्हा दाखल - कास पठार परिसरातील एकीव (ता. जावळी) गावच्या हद्दीतील एका हॉटेलात गुंडांनी पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी झालेल्या राड्यात प्रतीक बापूराव दळवी (रा. जकातवाडी, ता. सातारा) हा जखमी झाला होता. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून श्रेयस श्रीधर भोसले, सोन्या जाधव, रोहन जाधव, अमर पवार, समीर सलीम कच्छी याच्यासह अन्य संशयितांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती (ईटीव्ही भारत बातमीदार) दारूच्या नशेत गुंडांचा राडा -मेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रतीक दळवी आणि त्यांचे मित्र रविवारी जेवण करण्यासाठी एकीव (ता. जावळी) येथील हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी तेथे बारबाला संगीताच्या तालावर नाचत होत्या. दारूच्या नशेत बारबालांसोबत नाचणाऱ्या एका संशयितानं फिर्यादीचा मित्र धीरज शेळके याच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. फिर्यादीने जाब विचारताच त्याच्याही डोक्यात बाटली मारली. यावेळी बाटल्या फेकत संशयितांनी केलेल्या राड्यात हॉटेलच्या काचाही फुटल्या.
रफादफा केलेल्या प्रकरणाला फुटली वाचा - रेव्ह पार्टीत झालेल्या राड्यात हॉटेलच्या काचा, चारचाकी गाड्या फोडण्यात आल्या. तसंच दारूच्या बाटल्या मारल्याने ग्राहकांची डोकी फुटली. एकाच्या पोटावर शस्त्राचा वार झाला. एका गुंडाने ही पार्टी आयोजित केली होती. या घटनेची माहिती असतानाही पोलिसांनी हा मामला रफादफा केला होता. परंतु, एका व्हिडिओ आणि फोटोमुळे घटना चव्हाट्यावर आली. त्यामुळे जखमींची फिर्याद घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.