छत्रपती संभाजीनगर :उपजिल्हा रुग्णालयातून मृताच्या अंगावरील ४ तोळे सोने १३ हजार रोख रक्कम पळवल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी एक आरोपी ताब्यात घेतला असून मुद्देमाल जप्त केला आहे. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये (Gangapur Hospital) अपघातातील मृतदेहावरील २ लाख ८० हजाराचे सोन्याचे दागिने आणि जखमीच्या खिशातील १३ हजार रुपये चोरीस गेल्यानं नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन हैदराबाद येथील १४ भाविक मंगळवारी शिर्डी येथे आले होते. या अपघातातील मृतांच्या अंगावरील 4 तोळं सोनं आणि रोख पळवण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी दिली.
जीपचा भीषण अपघात : दर्शन घेऊन बाविक बुधवारी सकाळी जीपमधून वेरूळ लेण्या पाहिल्यानंतर घृष्णेश्वराला दर्शनासाठी गेले. त्यानंतर गंगापूरमार्गे शिर्डीला जात असताना रात्री १० वाजेच्या सुमारास तांबूळगोटा फाटा इथं त्यांच्या जीपला भीषण अपघात झाला. या अपघातात वैद्विक श्यामशेट्टी (६ महिने), अक्षता गडकुनुरी (वय २१) व प्रेमलता श्यामशेट्टी (५८) प्रसन्ना लक्ष्मी (४५) यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुमारसिंग राठोड यांनी दिली.