मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter) मुंबई CM Eknath shinde on Rain in Mumbai : मुंबईत आज दुपानंतर अचानक सोसाट्याचा वादळवारा आला. यामुळं मुंबईत दोन ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपवर मोठं होर्डिंग पडलं. या होर्डिंग्जखाली सुमारे 100 जण अडकल्याचं सांगण्यात येतंय. तसंच या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, आता घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले असून त्यांनी घटनेचा आढावा घेतला. यानंतर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत सरकारकडून देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय.
घाटकोपर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. 1 गंभीर जखमी असून एकूण 42 जखमींवर उपचार सुरू आहेत. 31 जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जखमींवर सरकारकडून उपचार : दरम्यान, घटनास्थळी भेट दिल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "यात 100 जण अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यातून 51 जणांना सुखरूप बाहेर काढलंय. तसंच अजूनही 35 ते 40 जण खाली अडकले असून यात आठ जणांचा मृत्यू झालाय. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि या घटनेची चौकशी करण्यात येईल. जे याला जबाबदार असतील, त्या संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच "जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य तो उपचार होतोय की नाही, याची चौकशी करण्यात येईल. जो उपचाराचा खर्च आहे तो सर्व सरकारकडून करण्यात येईल," असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
मुंबईतील सर्व होर्डिंगचे होणार ऑडिट : मुंबईत अनेक होडींग आहेत. त्यात अनाधिकृत किती होर्डिंग्ज आहेत आणि अधिकृत किती होर्डिंग्ज आहेत, याची चौकशी करण्यात येईल. तसंच मुंबईतील सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्यात येईल. यानंतर अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय. यातील जखमींवर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा :
- मुंबईत वादळी वाऱ्यामुळं दोन दुर्घटना; पेट्रोलपंपावर होर्डिंग्स कोसळल्यानं अनेक वाहनं दबली तर सुमारे 35 जण जखमी - Heavy Rain in Mumabi
- अवकाळी पाऊस, धुळीच्या वादळानं 'मायानगरी' आणि ठाण्यात हाहाकार, भर दुपारी दाटला अंधार; नागरिकांची तारांबळ - Rain in Mumbai