महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बैलपोळ्याला जुन्या मित्रांचे स्नेहसंमेलन; तब्बल 32 वर्षानंतर १९९२ च्या बॅचचे वर्गमित्र आले एकत्र अन् भरवली जत्रा - Get together - GET TOGETHER

Get together - दहावीत शाळा सुटल्यानंतर तब्बल ३२ वर्षानं वर्गमित्र एकत्र आले आणि त्यांनी बैलपोळा साजरा केला. अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार या गावात यानिमित्त बैल चांगलेच सजले होते. वाचा विशेष वृत्त...

बैलपोळ्याला जुन्या मित्रांचे स्नेहसंमेलन
बैलपोळ्याला जुन्या मित्रांचे स्नेहसंमेलन (ETV Bharat reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 1:25 PM IST

Updated : Sep 3, 2024, 3:13 PM IST

अमरावती Get together :कुणी प्राध्यापक झालं, कुणी डॉक्टर, एक दोघं तर सैन्यात सेवा देऊन सेवानिवृत्त देखील झालेत. कुणी अधिकारी झालं काही व्यवसायिक झालेत आणि तिघा चौघांनी तर गावात सधन शेतकरी म्हणून नाव कमावलं. हे सारे 1992 च्या इयत्ता दहावीतील वर्गमित्र. गावातील विद्याविहार विद्यालयातून बाहेर पडल्यावर तब्बल 32 वर्षानंतर या सर्वांनी एकत्रित येण्याचं ठरवलं. पोळ्याचा दिवस निश्चित झाला. आपल्या स्नेहसंमेलनात सारं गावच एकत्रित यावं अशी कल्पना पुढे आली आणि 32 वर्षानंतर एकत्रित येणाऱ्या ह्या वर्ग मित्रांनी चक्क गावात पोळ्यानिमित्त यात्राच भरवली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात येणाऱ्या शेंदूरजना बाजार या गावात या वर्ग मित्रांच्या प्रयत्नाने पोळ्याच्या पर्वावर सर्व जाती धर्माची माणसं एकत्रित आली.

बैलपोळ्याला जुन्या मित्रांचे स्नेहसंमेलन (ETV Bharat Reporter)


संपूर्ण गाव आलं एकत्र :शेंदूरजना बाजार या ठिकाणी संत अच्युत महाराज यांची समाधी असून हे वर्ष संत अच्युत महाराज जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. संत अच्युत महाराज जन्मशताब्दी वर्ष आणि पोळ्याचा सण या निमित्ताने 1992 मधील इयत्ता दहावीच्या वर्ग मित्रांनी एकत्रित येण्याचं नियोजन केलं. ग्रामीण संस्कृती, ग्रामस्थांमधील एकोपा याबाबतचे संस्कार गावातील तरुण पिढीवर व्हावेत असा उद्देश यामागे होता. या निमित्ताने आपल्या शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांसह संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. वाघमारे आणि आणि संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं. या गावातील सुपुत्रांसह उच्च पदावर पोहोचलेल्या व्यक्तींचा सत्कार करून त्यांचा आदर्श, गावातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असा मानस असल्याची माहिती प्रा. डॉ. अनिल निमकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. या सोहळ्यानिमित्त आज संपूर्ण गाव एकत्रित आलं हे आम्ही एकाच वर्गात शिकलेल्या सर्व जाती-धर्माच्या वर्ग मित्रांनी जपलेल्या प्रेमाचं प्रतीक असल्याचं देखील प्रा. डॉ. अनिल निमकर म्हणाले.

बैल जोड्यांची निघाली मिरवणूक : शेंदूरजना बाजार या गावात दरवर्षी पोळ्यानिमित्त सजलेले बैल एका ठिकाणी येतात. यावर्षी मात्र पोळ्यानिमित्त विशेष यात्रा आयोजित करण्यात आली. गावातील प्रत्येकाच्या घरची बैल जोडी या यात्रेत छान सजून आली होती. जवळपास 50 च्या वर बैलजोड्या या उत्सवात सहभागी झाल्या. उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेचं पहिलं बक्षीस राजू गांधी यांच्या बैलजोडीला मिळालं. द्वितीय पारितोषिक विनोद गवळी यांच्या बैलजोडीला तर तृतीय पारितोषिक अमोल ढोक यांच्या बैल जोडीने पटकावलं. सायंकाळी भर पावसात या सजलेल्या सर्व बैल जोड्यांची मिरवणूक वाजत गाजत गावात काढण्यात आली.

गावाला आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी : गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासह असणाऱ्या चार मित्रांनी शपथ घेऊन देशसेवेसाठी भारत सेवक समाज स्थापन केला. त्या चौघांपैकी एक मित्र नटेश आप्पाजी द्रविड हे नागपूरला आले. त्यांच्याकडे भारत सेवक समाजाचं काम विदर्भात वाढवण्याची जबाबदारी होती. त्यांच्या प्रयत्नातून शेंदूरजना बाजार येथे भारत कृषक समाजाचं काम सुरू झालं आणि बराच काळ ह्या भारत कृषक समाजाचं केंद्र हे आमचं शेंदूरजना बाजार होतं अशी माहिती यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. वाघमारे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. 1939 मध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने तीन दिवसीय व्यायाम प्रात्यक्षिक शिबिर शेंदूरजना बाजार येथे झालं असताना त्यावेळी शिबिरानिमित्त मध्य प्रांताचे राज्यपाल आले होते. आमच्या गावात एकोप्याचं वातावरण असून आता गावातील विद्या विहार विद्यालयातील 1992 च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी पोळ्याच्या निमित्ताने ग्रामस्थांना एकत्रित आणून जो सोहळा आयोजित केला तो इतर सर्वच गावांसाठी एक आदर्श असल्याचं देखील डॉ. बी. आर. वाघमारे म्हणाले.

हेही वाचा..

मेळघाटातील दुर्गम गावात वसलेल्या चिमुकल्यांना मिळालं वर्षभराचं शैक्षणिक साहित्य; अकोल्याच्या सेवा संस्थेचा पुढाकार - Amravati News

Last Updated : Sep 3, 2024, 3:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details