पुणे : सध्या जगभरात व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. या वीकमध्ये विविध डे साजरे केले जातात. १४ तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. १५ वर्षापूर्वी व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी पुण्यातील कोरेगाव पार्क इथल्या जर्मन बेकरीत नागरिक बसलेले असताना संध्याकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास या ठिकाणी स्फोट झाला. या स्फोटात १७ लोक ठार झाले तर, ५८ लोक जखमी झाले. या घटनेला गुरूवारी (दि.१३) १५ वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेला जरी पंधरा वर्ष पूर्ण होत असली तरी, ते दृश्य हा स्फोट बघणाऱ्या लोकांच्या अंगावर काटे आणत आहेत. एवढंच नव्हे तर, या स्फोटानंतर कोरेगाव पार्क इथल्या जर्मन बेकरी परिसरात विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.
नेमक काय झालं? कळालंच नाही : शंकर खरोसे यांनी जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटाची आठवण सांगितली. १३ फेब्रुवारी २०१० रोजी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास मोठा आवाज झाला. यावेळी मला काहीच कळलं नाही की, नेमकं काय झालं. मला वाटलं की, गॅस स्फोटाचा आवाज असेल पण, बेकरीत सगळं विचित्रच झालं होतं. बेकरीचं शेड खाली पडलं होतं. काचेचा खच इथं पडला होता. मी आत जाऊन गॅस सिलेंडर बघितलं तर, ते तसंच होतं. बेकरीमध्ये बघितलं तर, लोक इकड तिकडं पडले होते. बेकरीमध्ये असलेल्या काहींचा मृत्यू झाला होता. तर, काही लोक गंभीर जखमी झाले होते. आज देखील हा प्रसंग आठवला तर, अंगावर काटे येतात, अशी भयावह परिस्थिती प्रत्यक्षदर्शी शंकर यांनी सांगितली. त्यानंतर दोन वर्षे यातून सावरायला त्यांना लागली. अनेक दिवस झोप देखील लागत नसल्याचं ते म्हणाले.
स्फोटनंतर परिसरातील परिस्थिती बदलली : "स्फोट झाल्यावर कोरेगाव परिसरातील संपूर्ण परिस्थिती बदलली. सुरुवातीला एक- दोन वर्ष तर, कोणताही विदेशी नागरिक इथं येत नव्हता. तसंच आजही येणाऱ्या लोकांची तपासणी, चौकशी केली जाते. या परिसरात असलेल्या व्यवसायावर देखील याचा परिणाम झालाय. जे विदेशी पर्यटक पूर्वी इथं यायचे ते आता येत नाहीत. आता देखील खूप कमी लोक इथं येताना पाहायला मिळतात," असं शंकर खरोसे यांनी सांगितलं.