पुणे :पुणे शहर व परिसरात 'गुलेन बारी सिंड्रोम' (जीबीएस) या आजाराचे एकूण १०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. सोलापूरमध्ये या आजाराचा संशयित एक रुग्ण दगावला. "याबाबत माहिती घेतली जात आहे. पण या आजारात रुग्ण दगावत नाही. यापूर्वी देखील अनेक रुग्ण आढळले आहेत. रुग्णांना त्रास झाला आणि ते ऍडमिट देखील झाले. परंतु, नंतर परिस्थिती सुधारल्यावर रुग्ण हे घरी परत गेले," अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. पुण्यात या आजराचे रुग्ण हे वाढले आहेत आणि हे काळजीचा विषय असल्याचंही ते म्हणाले. आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी प्रकाश आबिटकर यांच्यासोबत खास संवाद साधला.
आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा :'जीबीएस' या आजाराबाबत माहिती घेण्यासाठी तसंच ज्या नांदेड गावातील विहिरीतून दूषित पाणी नागरिक पित आहेत त्या विहिरीची पाहणी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. यावेळी गावातील नागरिकांनी देखील आरोग्य मंत्री यांची भेट घेत स्वच्छ पाण्याची मागणी केली.