मुंबई :जया शेट्टी हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. या प्रकरणात विशेष न्यायालयाने छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा रद्द करून जामीन देण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा स्थगित करून त्याला जामीन मंजूर केलाय, मात्र छोटा राजन हा पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याने त्याला जामीन मिळूनही तुरुंगातच राहावे लागणार आहे. सध्या तो तिहार जेलमध्ये आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने छोटा राजनला जामीन दिलाय. जामिनासाठी एक लाख रुपयांचा बॉण्ड भरण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत.
राजनला मुंबईतील विशेष न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा: जया शेट्टी हत्याप्रकरणी छोटा राजनला मुंबईतील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली होती. भादंवि कलम 302, 120 ब अंतर्गत त्याला जन्मठेप आणि एक लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षा देण्यात आली होती. 2015 मध्ये छोटा राजनला परदेशात अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. तेव्हापासून त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आलंय.