मुंबई Lalbaugcha Raja First Day Donation : मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेल्या 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला असून पहिल्याच दिवशी म्हणजेच 'गणेश चतुर्थी'च्या दिवशी लाखो भाविकांनी गणरायांचं दर्शन घेतलं. 'लालबागच्या राजा'च्या दरबारात असलेल्या दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या दान रूपातील पैशाची मोजणी आजपासून (8 सप्टेंबर) सुरू झाली असून पहिल्याच दिवशी राजा चरणी भाविकांनी 48 लाख 30 हजार रुपये अर्पण केले असल्याचं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी सांगितलं.
गणरायांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी : 'लालबागचा राजा' यंदा मयूर महलात विराजमान झाला असून आपल्या लाडक्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तुडुंब गर्दीत देखील महिला, पुरुष, अबाल नागरिक, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक दूरवरून येऊन आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेतात. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं ठिकठिकाणी दानपेट्या ठेवलेल्या आहेत. या दान पेट्यांमध्ये भाविक आपल्या स्वेच्छेनं दान अर्पण करतात. कोणी सोन्या-चांदीच्या वस्तू तर कोणी पैशाच्या स्वरूपात दान या दानपेटीत अर्पण करतात. या जमा झालेल्या दानाची आज पासून मोजणी सुरू झालेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी या दान मतमोजणीत सहभागी झालेत. आज पासून सुरू झालेले हे मोजणीचं काम अनंत चतुर्दशीच्या आदल्यादिवशी पर्यंत सुरू असते.