मुंबई- राज्यातील गणेशभक्त आज लाडक्या गणरायाला निरोप देत आहेत. गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला आज राज्यभरातील गणेश मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येणार आहेत. मुंबईतील गणेश मिरवणुकीला देशभरातून लोक येतात. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत 24,000 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
Live updates
गणेशभक्तांकडून मुंबईमधील चौपाटीजवळ असणाऱ्या समुद्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे.
- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आज सकाळी आरती झाली.
- नरे पार्कमधील परळच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक भंडारा उधळत निघाली आहे. यंदा मल्हाररुपी परळचा राजा जेजुरीत विराजमान झाला होता. हातात तलवार घेऊन उंचच्या उंच बाप्पा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे. ढोल ताशांच्या गजरात मंडळाचे कार्यकर्ते आणि गणपती बाप्पाचे भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जड पावलांनी परळचा राजा सोबत निघाले आहेत.
- गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया..पुढच्या वर्षी लवकर या...असं म्हणत ढोल-ताशांच्या गजरात, सनई-चौघड्याच्या निनादात आणि उत्साहात आनंदात पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सकाळी साडेदहा वाजता वाजत गाजत सुरवात होणार आहे. पुण्याची मुख्य मिरवणूक महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि मानाच्या पाचही गणपतींची आरती होऊन मिरवणूक मार्गस्थ होईल.
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज सकाळी कार्यकर्त्यांकडून आरती झाल्यानंतर मंदिरामध्ये गणेश मूर्ती स्थानापन्न करण्यात आली आहे. दुपारी चार वाजता मुख्य मंदिरापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.
24,000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात-पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार गिरगाव चौपाटी, दादर, वांद्रे, जुहू, वर्सोवा, पवई तलाव आणि मढ बेट या ठिकाणी होणाऱ्या विसर्जनावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. मुंबईत नऊ अतिरिक्त पोलीस आयुक्त, 40 पोलीस उपायुक्त आणि 56 सहायक पोलीस आयुक्तांसह 24,000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. मिरवणुकीच्या दरम्यान शहरात वाहतूक कोंडी होते. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान वाहतू सुरळित राहण्यासाठी 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करण्यात येणार आहे. हा कॉरिडॉर अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवांसाठी 24 तास खुला असणार आहे.