बुलढाणा Ganpati Visarjan 2024 :बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील आदर्श विद्यालयाच्या गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक काढण्याची गेल्या चाळीस वर्षांपासूनची परंपरा आहे. त्यानुसार आज (मंगळवार) या मिरवणुकीत या शाळेतील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे सुमारे 6 हजार विद्यार्थी सहभागी झाले. प्रत्येक वर्गाचा सामाजिक संदेश देणारा वेगळा देखावा या मिरवणुकीत साकारण्यात आला. गेल्या चाळीस वर्षांची परंपरा असलेली ही अतिशय शिस्तबद्ध मिरवणूक राज्यातील एवढ्या मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थ्यांसह एकमेव विद्यार्थी गणेश विसर्जन मिरवणूक आहे. या मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमदार श्वेता महाले यांनी झेंडा दाखवून या मिरवणुकीला सुरुवात केली.
सामाजिक संदेश देणारे 69 जिवंत देखावे :गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे 69 जिवंत देखावे सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, क्रीडा, तंत्रज्ञान आणि ताज्या घडामोडींवर आधारित जिवंत देखावे केले. यामध्ये स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत समृद्ध भारत, शौचालय बांधा घरो घरी आरोग्य नांदी आपल्या दारी, बेटी बचाव बेटी पढाओ, ग्लोबल वार्मिंग, पर्यावरण वाचवा पर्यावरण संवर्धन करा, महिला सुरक्षिता, अंधश्रद्धा एक सामाजिक समस्या, वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा, रक्तदान श्रेष्ठदान, वाघ वाचवा पर्यावरण वाचवा साल मे एक बार ऋषिकेश द्वार, मोबाईलचे दुष्परिणाम, कोलकत्ता आणि बदलापूर येथील अत्याचारांवर आधारित जिवंत देखावे मिरवणुकीत साकारण्यात आले.