गडचिरोली Devendra Fadnavis :गडचिरोली येथील निर्माणाधीन सुरजागड पोलाद प्रकल्पातून 8 दशलक्ष टन, तर लॉईड्स प्रकल्पातून चार दशलक्ष टन पोलाद उत्पादन होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात ३० टक्के पोलाद उत्पादन एकट्या गडचिरोलीतून होणार आहे. त्यामुळं गडचिरोलीत उद्योगांसह रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असून माओवादामुळं मागे राहिलेला गडचिरोलीतील सामान्य माणूस समृद्धीकडं जात असल्याचं चित्र आपणास बघायला मिळेल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज गडचिरोली येथील सुरजागड इस्पात स्टील प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न-औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची देखील उपस्थित होती.
20 हजार रोजगारनिर्मिती :गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणार्या उद्योगात 80% रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून देण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचा स्थानिक नागरिकांना फायदा होणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातीन जल, जमीन, जंगल हे वैभव टिकवूनच येथे उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबत आदिवासींचे दैवत असलेल्या ठाकूर देवाजवळ कोणत्याही प्रकारचं उत्खनन होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. चामोर्शीत सुद्धा 35 हजार कोटींची गुंतवणूक होत असून त्यातून 20 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गडचिरोलीत योजनांचा पाऊस :गडचिरोलीत विमानतळ, रेल्वे काम प्रगतीपथावर आहे. यासोबतच येथे शिक्षण हब तयार करण्यात येत आहे. तसंच मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आहे. १७० कोटींचं इनोव्हेशन सेंटर तयार होत असून शासनानं उच्च व तंत्र शिक्षण घेणार्या मुलींना शंभर टक्के फी सवलत देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्हा उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबईपर्यंत जोडण्यात येणार आहे. यासोबतच चामोर्शी ते काकीनाडा बंदरापर्यंत मालवाहतुकीसाठी जलमार्ग तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तत्पूर्वी राज्यातील जनसामान्यांचा विकास होण्याकरता आज आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाला साकडं घालत असल्याचं ते म्हणाले.
गडचिरोली महाराष्ट्राच्या विकासाचं केंद्र : गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कोटींची खनिज संपत्ती येथील आदिवासी समाजाला आर्थिक सुबत्ता देऊन जाईल. त्यानिमित्त जिल्ह्यात येणार्या हजारो कोटी गुंतवणुकीचा येथील नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राज्य शासनातर्फे शेतकर्यांना सक्षम करण्याचं काम करण्यात येत आहे. या अनुषंगानं वीज बिलात माफी, धानाला बोनस, दर्जेदार शिक्षण, पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा अशा विविध सवलतीच्या योजनांसोबतच आता महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये मदत, पात्र महिलांना देण्याची योजना आमचं शासन राबवत असल्याचं ते म्हणाले. गडचिरोली हे महाराष्ट्राच्या विकासाचं केंद्र बनेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.