छत्रपती संभाजीनगर :स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्याची मागणी करूनही न्याय मिळत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायती अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यात घडली. गोळेगाव या गावात एक नाहीतर चार वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमी आहेत. मात्र, रस्ता नसल्यानं येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मंगळवारी रात्री गावात एका वृद्धाचा मृत्यू झाला, पावसामुळं गावात असलेला कच्चा रस्ता चिखलमय झाल्यानं अंत्यविधीसाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळं संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचातीसमोरच अंत्यसंस्कार करून संताप व्यक्त केला. यावर भाजप नेत्यांनी हा रस्ता होऊ दिला नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं.
स्मशान भुमिसाठी केली होती रस्त्याची मागणी : छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथं स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करून संताप व्यक्त केला. गावाबाहेर कोळी समाज, गव्हाणे पाटील, झोंड पाटील, धनगर समाज अशा चार वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमी आहेत. पण तिथं जाण्यासाठी कच्चा आणि छोटा रस्ता आहे. पावसाळ्यात एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यास अनेक अडचणी येतात. तसंच असलेल्या कच्च्या रस्त्यावर चिखल होत असल्यानं, मृतदेह घेऊन जाताना कसरत करावी लागते. रस्त्याचं रुंदीकरण व सिमेंटीकरण करावं, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थांनी टोकाचं पाऊल उचललं.
मृतदेह घेऊन ग्रामपंचायत गाठली : गोळेगाव गावातील लक्ष्मण रायभान गव्हाणे यांचा मंगळवारी मृत्यू झाला. मात्र, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी गावामध्ये स्मशानभूमी कडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थांनी मृतदेह घेऊन ग्रामपंचायत गाठली. त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यानं, संतप्त ग्रामस्थांनी थेट गावातील ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार केले. चार वर्षांपासून मागणी करूनही न्याय मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यानंतर ग्रामपंचायतीतर्फे तातडीनं तहसीलदार यांना रस्त्यासाठी पत्र देण्यात आलं.
अब्दुल सत्तार यांनी दिलं स्पष्टीकरण : सिल्लोड तालुक्यातील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय आणि भाजपाचे नेते सुरेश बनकर यांच्या ताब्यातील ही ग्रामपंचायत आहे. मराठा समाजबांधवांना स्मशानभूमी नाही, जाण्यासाठी रस्ता नाही. रस्ता पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी 2022 मध्ये मंजूर करून दिला. परंतु रस्ता बनल्याय अब्दुल सत्तारांना राजकीय फायदा होईल, म्हणून भाजपा नेते सुरेश बनकर यांनी आपल्या ताब्यातील ग्रामपंचायतकडून सदर रस्त्याची कागदपत्रं दिली नाही, कार्यारंभ आदेश होऊ दिला नाही. त्याचा उद्रेक आज ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करून झाला. ही घटना खरंच निंदनीय आहे. राजकीय स्वार्थ, वैर बाजूला ठेवून मंजूर करून दिलेला रस्ता केला असता, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती," अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालय मार्फत देण्यात आली.
हेही वाचा
- शरद पवारांचा भाजपाला पुन्हा 'दे धक्का'; संजय काकडे 'तुतारी' घेणार हाती
- "एअर इंडियानं अन्याय केला...", रामदास आठवले नागरी उड्डाण मंत्र्यांकडं करणार तक्रार, नेमकं प्रकरण काय?
- मंत्रालयात नोकरीच्या आमिषानं गंडवलं; लिपिक पदाचं बनावट नियुक्तीपत्र दिलं, जोडपं अटकेत