महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Free Education to Students: शिक्षकाकडून घरोघरी जाऊन मोफत शिक्षण, गाव तांड्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो फायदा

Free Education to Students : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील रामेश्वर राठोड हे परिसरात आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जातात. ते आसपासच्या गाव आणि ताड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करत आहेत.

Free Education to Students: घरोघरी जाऊन मोफत शिक्षण देणारा अवलिया, गाव तांड्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो फायदा
Free Education to Students: घरोघरी जाऊन मोफत शिक्षण देणारा अवलिया, गाव तांड्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो फायदा

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 10:21 AM IST

रामेश्वर राठोड

छत्रपती संभाजीनगर Free Education to Students : आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणलं की त्यांचं कार्य अनेकांना प्रेरणा देतं. मात्र असे काही शिक्षक असतात ज्यांचं कार्य जगासमोर येत नाही. पण ते कौतुकास्पद असतं. असंच काहीसं कार्य कन्नड तालुक्यातील शिक्षक असलेल्या रामेश्वर राठोड (Rameshwar Rathod) यांचं आहे. अगदी छोट्याश्या गावातील खासगी शाळेत शिकवणारे शिक्षक गावात आणि तांड्यावरील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करुन शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी मदत करतात. विशेषतः दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या काळात अभ्यासात अडचण असणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी घरी जाऊन शिकवतात.


गेल्या चार वर्षांपासून करतात मदत : कन्नड तालुक्यातील हतनूर गावातील अंतर्गत येणाऱ्या घुसुर गावात रामेश्वर राठोड या शिक्षकानं वेगळाच आदर्श निर्माण केलाय. ते एका खासगी शाळेत शिकवतात. ते हिंदी, मराठी, इंग्रजी आणि विज्ञान अशा विषयात पारंगत आहेत. अगदी छोट्याश्या गावात राहून त्यांनी आपलं शिक्षण घेत शिक्षकीपेशा स्वीकारला. मात्र, फावल्या वेळात भरमसाठ शुल्क आकारुन शिकवणी सुरु करण्याऐवजी त्यांनी गाव तांड्यावर असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन सुरू केलं.

ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यात डोंगरातील तांडे येथे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी येतात. राठोड यांनी त्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न केला. शाळेत जाताना होणारा त्रास पाहता अनेक जण शाळेत जाण्याचं टाळतात. शाळेतून आल्यावर पुन्हा शिकवणी लावणे अनेकांना शक्य होत नाही. तर काही जणांना ते आर्थिक स्थितीमुळं पण शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं याकरिता रामेश्वर राठोड गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत असतात. त्यामुळं ग्रामीण भागातील मुलांना मदत होते, असा अनुभव रामेश्वर राठोड यांनी सांगितलं.



मिळेल तिथं देतात शिक्षण :भरमसाठ शुल्क घेणाऱ्या खासगी संस्थांकडं जागा असते. मात्र छोट्या गावातील मोफत मार्गदर्शन देणाऱ्या राठोड यांच्याकडं मुलांना शिकवता येईल, अशी जागा नाही. त्यामुळं मिळेल त्या ठिकाणी त्यांचा वर्ग भरवला जातो. कधी झाडाखाली तर कधी मंदिरात हा वर्ग भरतो. तर कधी विद्यार्थी भेटले तिथं त्यांची शिकवणी सुरू होते. अभ्यास करताना एखाद्या विषयात काही मुद्दे समजले नाही तर मुलं त्यांना प्रश्न विचारतात. त्यावर ते त्यांच्या मोकळ्या वेळात त्यांच्या अडचणी सोडवण्यास मदत करतात. ग्रामीण भागातील मुलांना गणित, विज्ञान आणि इंग्रजी सारख्या विषयात अडचणी येतात. यात मला आनंद मिळत असल्याचं राठोड यांनी सांगितलं.

सरांमुळं मिळते मदत : रामेश्वर राठोड ग्रामीण भागात चांगलेच परिचित झाले आहेत. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या काळात पेपरच्या वेळी अभ्यास करताना आलेल्या अडचणी सोडवताना ते मुलांच्या घरी जाऊनदेखील शिकवतात. याबाबत विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थी म्हणाले, " सरांच्या मदतीनं अभ्यास चांगला होतो. खराब रस्ते, कुठल्याही सुविधा जवळ नसल्यानं अभ्यास करण्याची इच्छा होत नाही. कधी-कधी तर शाळेतदेखील जावं वाटत नाही. त्यावेळी सर स्वतः त्यांच्या दुचाकीनं सोडतात. शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी, ते आम्हाला मदत करतात. त्यांना संपर्क करुन अडचण सांगितल्यास कधीही नकार न देता ते शिकवण्यासाठी पुढाकार घेत असतात. त्यामुळं मदत होते," असा अनुभव विद्यार्थ्यांनी सांगितला.

हेही वाचा :

  1. सर्वेक्षणासाठी शिक्षक रस्त्यावर तर शाळेत मुले वाऱ्यावर, तरी सर्वेक्षणात अनंत अडचणी

ABOUT THE AUTHOR

...view details