मुंबई Property Fraud Case: माहीम परिसरातील मालमत्तेचा विकास करण्यासाठी ठराव करत मालमत्तेमधील गाळे खाली करण्यासाठी आणि भाडेपट्टाधारक कुटुंबासोबत संमती करार करण्यासाठी २२ कोटी रुपये खर्चायला भाग पाडून जागेची परस्पर विक्री करत बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ६३ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 420, 409 आणि 120 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाट यांनी दिली आहे. एच.आय.एम.एस. बोटवाला चॅरीटीज बोटवाला टस्ट्र, शमीन इब्राहीम बोटवाला, नस्ली जमशेद बाटलीवाला आणि जुबेन सुलेमान बोटावाला यांच्या विरोधात हा गुन्हा माहीम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारे झाली फसवणूक :वांद्रे पश्चिम परिसरात राहत असलेल्या ६३ वर्षीय बांधकाम व्यावसायिक जावेद मोहम्मद हुसेन यांनी माहीम पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, यातील आरोपींनी संगनमताने कट रचून चॅरीटीज ट्रस्टच्या माध्यमातून १९९७ साली त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपींनी धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या मालकीच्या माहिममधील मालमत्तेतील २१ गाळे खाली करण्यासाठी आणि भाडेपट्टाधारक कुटुंबासोबत संमती करार करण्यासाठी तक्रारदार यांना एकूण २२ कोटी रूपये खर्च करायला लावले. आरोपींनी संस्थेच्या माध्यमातून या मालमत्तेचा विकास तक्रारदार यांनी करण्याचा ठराव ऑक्टोबर २०१३ मध्ये केला.