अमरावती Cricketer Bus Accident Amravati : अमरावती-यवतमाळ मार्गावर नांदगाव-खंडेश्वरलगत शिंगणापूर येथे सिमेंट मिक्सर ट्रकनं टेम्पो ट्रॅव्हलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अमरावती शहरातील चार तरुण जागीच ठार झालेत. तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती शहरातील हे सर्व तरुण यवतमाळ येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघाले असताना ही घटना घडली.
यवतमाळला क्रिकेट स्पर्धेसाठी जात होते क्रिकेटपटू : या भीषण अपघातात श्रीहरी राऊत, आयुष बहाळे, सुयश अंबरते, संदेश पाडर या चार जणांचा मृत्यू झालाय. ते अमरावती शहरातील रहिवासी आहेत. रुक्मिणी नगर आणि रवी नगर येथील असणारे 15 तरुण क्रिकेटपटू हे यवतमाळ येथे आयोजित क्रिकेट सामन्यासाठी टेम्पो ट्रॅव्हल्सनं निघाले होते. सकाळी 9 वाजेच्या सुमारास नांदगाव खंडेश्वरपासून काही अंतरावर असणाऱ्या शिंगणापूर फाट्यालगत भरधाव वेगात असणाऱ्या सिमेंट काँक्रिट मिक्सर ट्रकनं टेम्पो ट्रॅव्हलला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, चार तरुण घटनास्थळीच ठार झालेत, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.