महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उल्कापातामुळं सातपुडा पर्वत परिसरात चार कुंडांची निर्मिती; गव्हाणकुंडाच्या गुफेतील शिवलिंगाचे वैशिष्ट्य काय? - SATPUDA MOUNTAIN SHIVLINGA

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात गव्हाणकुंड या गावालगत असणाऱ्या या नैसर्गिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या कुंड अन् गुफेसंदर्भात "ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

Four pools formed in the Satpuda mountain
सातपुडा पर्वत परिसरात चार कुंडांची निर्मिती (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2025, 7:37 PM IST

Updated : Feb 10, 2025, 7:54 PM IST

अमरावती- पृथ्वीवर 50 हजार वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापातामुळे भारतात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर ज्याप्रमाणे निर्माण झालंय, त्याच वेळी सातपुडा पर्वत रांगेत चार छोट्या उल्का पडल्या. ज्या ठिकाणी या उल्का पडल्या, त्या ठिकाणी चार छोटे कुंड निर्माण झालेत आणि एक उल्का ही पर्वताच्या आत शिरल्यानं पर्वतात एक मोठं भुयार तयार झालंय. उल्कापात झालेल्या या परिसरात 12 ही महिने पाण्याचा प्रवाह असतो. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात गव्हाणकुंड या गावालगत असणाऱ्या या नैसर्गिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या कुंड अन् गुफेसंदर्भात "ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

परिसरात चार कुंड :गव्हाण कुंड या गावालगत देवता नावाची नदी वाहते. या नदीच्या पात्रात एकूण चार मोठे कुंड आहेत. पहिला हत्ती कुंड हा या परिसरात नदीवर झालेल्या बांधकामामुळे बुजला आहे, तर तीन कुंड हे नदीपात्रात पाहायला मिळतात. दुसरा जो मोठा कुंड आहे, त्याला विहीर कुंड असं म्हणतात. हा कुंड अतिशय खोल आहे. तिसरा कुंड हा माणूस कुंड म्हणून ओळखला जातो आणि चौथ्या कुंडाला बैल कुंड असं म्हणतात. पूर्वी विहीर कुंडामध्ये गव्हाण कुंड गावातील लहान मुलं पोहायला जायची. माणूस कुंडातील पाणी हे धार्मिक विधीसाठी वापरले जायचं आणि बैलकुंडमधल्या पाण्यावर गावातील बैलांना आणलं जायचं, या कुंडात बैलांची आंघोळदेखील व्हायची. या कुंडांचा ग्रामस्थांकडून जसा उपयोग केला जायचा, त्या पद्धतीमुळे या कुंडांचं नाव पडल्याची माहिती वरुड येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त महसूल उपायुक्त शेषराव खाडे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली. या परिसरात कधी तरी उल्का पडल्या, त्यामुळे या ठिकाणी या कुंडांची निर्मिती झाली. आज हा परिसर अतिशय छान अन् निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो, असंदेखील शेषराव खाडे यांनी सांगितलंय.

मेक्सिको आणि भारतात एकाच वेळी उल्कापात : 50 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर भारतात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार परिसरात उल्कापात झाला, त्याच वेळी मेक्सिको या देशात एक उल्का जमिनीवर पाच वेळा उसळली आणि त्या देशात एकाच ठिकाणी पाच कुंड निर्माण झालीत. याच दरम्यान एक छोटीशी उल्का गव्हाणकुंड गावालगत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी पडली आणि त्यामुळे या परिसरात चार तळी निर्माण झाली. त्याचवेळी एक उल्का ही पहाडाच्या आत मध्ये शिरली आणि त्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार झाला. या भुयारातून पाणी वहायला लागलं. पुढे या ठिकाणाला देवाचं स्थान म्हणून ओळखल्या जाऊ लागलं आणि महादेवाची इथे एक पिंड आहे अशी आख्यायिका तयार झाली असावी असं इतिहास, भौतिकशास्त्र आणि गणित विषयाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी "ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.

गव्हाणकुंड येथे गुहेतून सतत वाहतं पाणी :या परिसरात जेव्हा उल्कापात झाला त्यावेळी एक उल्का ही पर्वताच्या आतमध्ये शिरली आणि त्या ठिकाणी मोठं भुयार निर्माण झालं. हे भुयार थेट सालबर्डी येथील महादेवाच्या गुहेत निघत असल्याचं सांगितलं जातं. या गुहेतून बाराही महिने गोड पाण्याचा झरा बाहेर येतो. या गुहेमध्ये भलं मोठं शिवलिंग नैसर्गिकरीत्या निर्माण झालीय. एका कपारीत हे भलं मोठं शिवलिंग आहे तर दुसऱ्या बाजूला पर्वताच्या आतमध्ये लांब असं भुयार दिसते, असंदेखील शेषराव खाडे यांनी सांगितलं.

शिवलिंगावर पूर्वी नैसर्गिक दुधाचा अभिषेक : गुहेत ज्या ठिकाणी नैसर्गिकरीत्या शिवलिंग तयार झालं, त्या ठिकाणी वरच्या भागात दगडांमध्ये शेकडो असे दगडी स्तन निर्माण झालेत. या स्तनांमधून आज देखील सतत पाणी गळत राहतं. पूर्वी या ठिकाणी क्षारांचं प्रमाण अधिक असल्यानं कदाचित त्यावेळी पाण्याचा रंग हा पांढराशुभ्र असल्यामुळे भुयाराच्या वरच्या भागात असणाऱ्या स्तनांच्या आकारातील शेकडो दगडांमधून शिवलिंगावर दूध पडतं असावं, असंदेखील शेषराव खाडे यांनी म्हटलंय.

या भागात रेल्वे मार्ग अशक्य :आज अमरावती नरखेड हा जो रेल्वे मार्ग अस्तित्वात आहे, तो फार पूर्वी वरुड, मोर्शी तालुक्याला लागून असणाऱ्या सातपुडा पर्वत रांगेतून काढण्याचा विचार झाला होता. त्यावेळी वरुड, मोर्शी परिसरात सातपुडा पर्वत हा आतून बराच पोकळ असल्यामुळे या भागातून रेल्वे मार्ग काढणं अशक्य असल्याचा अहवाल तज्ज्ञांनी दिला होता. यामुळेच रेल्वे प्रशासनांना त्यावेळी या भागातून रेल्वे नेण्याचा विचार रद्द केला, असंदेखील शेषराव खाडे म्हणतात.

तीन नद्यांचा संगम :या परिसरात वाहणाऱ्या देवता नदीमध्ये उल्कापातामुळे निर्माण झालेले चार कुंड दिसतात. चौथा कुंड ज्या ठिकाणी आहे, त्याच्या डाव्या बाजूनं वाहत येणाऱ्या नदीचं नाव लक्ष्मी नदी असून, गुहेतून वाहणाऱ्या पाण्याला सरस्वती नदीचे उगम असं म्हणतात. या तिन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं, अशी मान्यता असल्यामुळे गव्हाणकुंड या गावासह लगतच्या परिसरातील अनेक जण या ठिकाणी दशक्रिया विधी करतात.

महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी :उल्कापात झाल्यामुळे तयार झालेल्या गुहेत नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या शिवलिंगाला कपिलेश्वर महादेव असं म्हटले जातं. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भाविकांची कपिलेश्वराच्या दर्शनाकरिता गर्दी उसळते. आता महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा गव्हाणकुंडासह परिसरातील अनेक गावांमधून भाविक कपिलेश्वराच्या दर्शनाकरिता येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी या परिसराला जत्रेचे स्वरूप येतं असं शेषराव खाडे सांगतात.

सातपुडा पर्वत परिसरात चार कुंडांची निर्मिती (Source- ETV Bharat)

नदीवर आर्च असणारा विदर्भातला पहिला पूल :देवता नदीच्या पात्रात उल्कापातामुळे चार कुंड तयार झाले असताना या नदीवरून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या गावांना जोडणाऱ्या मार्गावर रुंद असा पूल बांधण्यात आलाय. या पुलाचे बांधकाम करताना पहिल्यांदा आर्च डिझाईन करण्यात आलंय. त्यावेळी मोर्शी-वरुडचे आमदार आणि राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून त्यावेळी अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असणारे धनंजय धवड आणि वरुड तालुक्यातले उप अभियंता असणारे मधुकर धोटे यांच्या परिश्रमातून हा पूल एका आर्कच्या साह्याने उभारण्यात आला. अशा स्वरूपाचा पूल हा विदर्भातला पहिला पूल आहे, असं शेषराव खाडे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. दहावी, बारावीची परीक्षा यंदा लवकर; वाचा, परीक्षेचे वेळापत्रक - SSC HSC Exam Time Table 2025
  2. जन्मतःच दोन्ही हात नसलेल्या गौसनं चक्क पायानं पेपर लिहून बारावीत मिळवले 78 टक्के मार्क... - Gous Shaikh Motivatinal Story
Last Updated : Feb 10, 2025, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details