महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेडिको कंपनीत टाकी फुटल्यानं चौघांचा मृत्यू, कंपनीची माहिती देण्यास टाळाटाळ - METAL TANK EXPLOSION

छत्रपती संभाजीनगर येथील रेडिको या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीत मेटल टाकी फुटल्यानं चार कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.

METAL TANK EXPLOSION
मेटल टाकी फुटल्यानं चार जणांचा मृत्यू (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2024, 10:17 PM IST

छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा औद्योगिक वसाहतीत मोठी दुर्घटना घडली. रेडिको या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीत मेटल टाकी फुटल्यानं चार कामगारांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. मका भरलेली जुनी टाकी वेल्डिंग करताना ही घटना घडली. काही वेळ टाकीतून गळती सुरू होती. मात्र, अचानक ती फुटली असून, दहा ते बारा लोक त्या ठिकाणी असल्याची भीती व्यक्त केली जात होती.

जेसीबीच्या माध्यमातून मका बाजूला करून अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. जखमी रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. किसन हिर्डे, दत्ता बोदरे, संतोष पोपळघट आणि अन्य एक असे मृत मजुरांचे नावं आहेत.

मेटल टाकी फुटल्यानं चार जणांचा मृत्यू (Source - ETV Bharat Reporter)

वेल्डिंग करताना टाकी फुटली : शेंद्रा औद्योगिक मद्य निर्मिती करणाऱ्या रेडिको एनव्ही या कंपनीत मका साठवण करण्यासाठी मोठ्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यातील एक टाकी खराब झालेली होती. दुपारी अडीचच्या सुमारास जेवणाची वेळ झाल्याने काही कामगार बाहेर गेले होते. त्यावेळी टाकीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. फुटलेल्या टाकीतून मका बाहेर गळत होता. तशाच परिस्थितीत टाकीला वेल्डिंग करण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र अचानक मोठा आवाज झाला आणि ती टाकी फुटली. हजारो टन मका बाहेर पडला आणि त्यात जवळ असलेले मजूर दबून गेले. सुरुवातीला चौघांना बाहेर काढण्यात आले असून, त्यातील तिघांचा मृत्यू दुपारीच झाला तर एकाचा मृतदेह रात्री बाहेर काढण्यात आला. तर काही किरकोळ जखमी झाले. अस असल तरी कंपनी प्रशासनाने ठोस माहिती न दिल्याने संभ्रम वाढला आहे. मक्याच्या ढिगाऱ्यात आणखी काही मजूर अडकले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

कंपनीनं माहिती देण्यास टाळाटाळ? : दुपारी अडीचच्या सुमारास घटना घडल्यावर रात्रीपर्यंत नेमकी घटना कशी घडली? किती कामगारांचा मृत्यू झाला किंवा जखमी झाले? याबाबत माहिती देण्यात आली नाही. जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार कल्याण काळे यांनी घटनास्थळी पाहणी करत कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यावेळी तांत्रिक विभागाकडे माहिती विचारून सांगू, असं उत्तर देत वेळ मारून नेण्याचं काम कंपनी व्यवस्थापकानं केलं असल्याचा आरोप खासदारांनी केला. "सदरील टाकी जुनी झाली असल्याने ही दुर्घटना झाली, याबाबत टाकी बदलण्याची गरज होती का? त्याबाबत पूर्वकल्पना होती का? हे प्रश्न आहेत. आता कंपनीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा," अशी मागणी खासदार काळे यांनी केली.

हेही वाचा

  1. "आघाडीनं महिलांना एक रुपया तरी दिला का अन् आता योजना चोरता"
  2. शिक्षक निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
  3. छत्रपती संभाजीनगरात सापडली सोन्या-चांदीनं भरलेली गाडी; तब्बल 'इतक्या' कोटींचं घबाड जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details