महाराष्ट्र

maharashtra

आयएनएस ब्रह्मपुत्रा जहाजाला लागलेल्या आगीत खलाशी बेपत्ता ; नौदलाला आढळला जवानाचा मृतदेह - INS Brahmaputra Fire

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 7:00 AM IST

INS Brahmaputra Fire : नौदलाच्या आएनएस ब्रह्मपुत्रा या जहाजाला भीषण आग लागली होती. या आगीत जहाजाचे प्रमुख खलाशी सितेंद्र सिंह हे बेपत्ता होते. दरम्यान नौदलाला त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

INS Brahmaputra Fire
संपादित छायाचित्र (Reporter)

मुंबई INS Brahmaputra Fire :मुंबईतील नौदलाच्या गोदीत भारतीय नौदलाचे जहाज ब्रह्मपुत्रा या जहाजाला भीषण आग लागली होती. या आगीत एक खलाशी बेपत्ता होता. या बेपत्ता खलाशाचा मृतदेह नौदलाला आढळून आला आहे. सितेंद्र सिंह असं बेपत्ता खलाशाचं नाव असून ते आयएनएस ब्रह्मपुत्रा जहाजावर प्रमुख खलाशी म्हणून कार्यरत होते. आयएनएस ब्रह्मपुत्रा जहाजाला भीषण आग लागल्यानंतर नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी 23 जुलैला मुंबईला भेट दिली. त्यांनी आगीच्या अपघाताच्या घटनांचा क्रम आणि बेपत्ता खलाशाचा शोध घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.

प्रमुख खलाशी सितेंद्र सिंह (Reporter)

आयएनएस ब्रह्मपुत्रा जहाजाला भीषण आग :भारतीय नौदलाच्या आयएनएस ब्रह्मपुत्रा जहाजाला 21 जुलै 2024 रोजी सायंकाळी आग लागली आहे. मुंबईतील नौदल डॉकयार्ड इथं रिफिट म्हणजेच दुरुस्त करताना आयएनएस ब्रम्हपुत्रा या भारतीय नौदलाच्या जहाजाला आग लागली. नौदल डॉकयार्ड मुंबई आणि बंदरातील इतर जहाजांच्या मदतीनं जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी 22 जुलैला सकाळपर्यंत आग आटोक्यात आणली. 22 जुलै 2024 रोजी सायंकाळपर्यंत सॅनिटायझेशन तपासणीसह पुढील कार्यवाही करत आगीचा धोका टाळण्यात आला. मात्र, या आगीच्या घटनेत एक खलाशी बेपत्ता झाल्याची घटना घडली.

आयएनएस ब्रम्हपुत्रावरील प्रमुख खलाशी बेपत्ता :आयएनएस ब्रम्हपुत्रा या नौदलाच्या जहाजाला भीषण आग लागल्यानंतर जहाजावरील प्रमुख खलाशी सितेंद्र सिंह हे बेपत्ता झाले होते. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सितेंद्र सिंह यांचा शोध घेण्यात आला. यावेळी जवानांना सितेंद्र सिंह यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जहाज लवकरात लवकर कार्यक्षम करण्यासाठी योजना आणि दुरुस्तीबाबत नौदल प्रमुखांना माहिती देण्यात आली. आयएनएस ब्रह्मपुत्रा जहाजाला समुद्रसफारी आणि लढाईसाठी सज्ज करण्यासाठी सर्व कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देश नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी कमांड आणि नौदल मुख्यालयाला दिले आहेत.

नौदल प्रमुखांनी केलं सितेंद्र सिंह यांच्या कुटुंबाचं सांत्वन :आयएनएस ब्रह्मपुत्रा जहाजाला आग लागल्यानंतर नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी मुंबईत भेट दिली. यावेळी त्यांनी आयएनएस ब्रह्मपुत्राच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. भारतीय नौदलात आयएनएस ब्रह्मपुत्रा जहाज लवकर कार्यान्वित करण्याच्या दिशेनं काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. समुद्रातील शोधमोहिमेनंतर प्रमुख खलाशी सीतेंद्र सिंह यांचा मृतदेह सापडला आहे. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्यासह भारतीय नौदलाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रमुख खलाशी सितेंद्र सिंह यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. या दु:खद प्रसंगी भारतीय नौदल शोकाकुल परिवारासोबत खंबीरपणे उभं असल्याची माहिती नौदल अधिकाऱ्यानं दिली आहे.

हेही वाचा :

भारतीय नौदलाच्या 'ब्रह्मपुत्रा' जहाजाला लागलेली आग विझवण्यात यश, एक खलाशी बेपत्ता - INS Brahmaputra Fire

ABOUT THE AUTHOR

...view details