महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छायाचित्रकाराची घरात घुसत गोळ्या झाडून हत्या, २४ दिवसात नागपुरात १३ खून

नागपुरातील सदर पोलीस ठाणे हद्दीतील राजनगर इथं आज (24 फेब्रुवारी) रोजी एका छायाचित्रकाराची त्याच्या राहत्या घरात घुसून काही गुंडांनी गोळी झाडून हत्या केली. विनय पुणेकर असं मृताचं नाव आहे. या हत्याकांडाचा तपास नागपूर पोलीस करीत आहे.

Former press photographer shot dead
विनय पुणेकर

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 6:19 PM IST

हत्याकांडाविषयी माहिती देताना पोलीस उपायुक्त राहुल मदने

नागपूर Nagpur Crime :नागपुरातील गुन्हेगारी आता अक्षरशः बेलगाम झाली असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. २२ दिवसात १२ हत्येच्या घटना घडल्यानंतर आज पुन्हा एकाची हत्या झाल्यानं खुनाचा आकडा तेरावर पोहोचला आहे. सदर पोलीस ठाणे हद्दीतील राजनगर इथं आज (24 फेब्रुवारी) भरदिवसा एकाची त्यांच्याच घरात घुसून गोळ्या झाडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. विनय उर्फ बबलू पुणेकर असं हत्या झालेल्या या छायाचित्रकाराचं नाव आहे.

हत्येचं कारण अज्ञात:विनय पुणेकर यांची हत्या कुणी आणि कशासाठी केली, याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. मात्र, जुन्या वैमनस्यातून हत्या झाली असावी, असा कयास लावला जात आहे. सध्या सदर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह नागपूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विनय पुणेकर कधी काळी प्रेस फोटोग्राफर होते, अशी देखील माहिती पुढं येत आहे.


आरोपींचा शोध सुरू, काही पुरावे पोलिसांच्या हाती:विनय पुणेकर गेल्या अनेक दिवसांपासून पत्नीपासून विभक्त राहत होते. आरोपींनी त्यांच्या गळ्यात गोळी मारली आहे. त्यांच्या संपत्तीचा वाद सुरू होता, अशी देखील चर्चा सुरू आहे. पोलिसांना हत्या कुणी केली असावी, याबाबत माहिती समजल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याआधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे. घटनास्थळी मृतकाचा मोबाईल फोन आढळून आला आहे. त्या फोनवर कुणा कुणाचे कॉल्स आले होते, त्याचा देखील तपास पोलिसांनी सुरू केलाय.

आज दुपारी बारा वाजता एका अज्ञात व्यक्तीनं गोळीबार करुन विनय पुणेकर नामक छायाचित्रकाराची हत्या केली आहे. आम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत आहोत. हा गुन्हा आम्ही लवकरच उघडकीस आणू. : राहुल मदने, पोलीस उपायुक्त, नागपूर

फोटो, व्हिडिओच्या आधारे तपास सुरू :विनय पुणेकर यांच्या हत्येमागं नेमकं कोणतं कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. यासाठी टीम तयार करण्यात आली असून काही फोटो आणि मोबाईल फोन मिळाला आहे. पोलिसांना एका तरुणाचा व्हिडिओसुद्धा मिळाला आहे. त्या आधारे तपास केला जातं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

२४ दिवसात १३ हत्या:गेल्या २२ दिवसांच्या कालावधीत नागपूरमध्ये १२ हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात दोन दुहेरी हत्याकांडाचा देखील समावेश आहे. शहरात २४ दिवसांमध्ये नागपुरात १३ खुनाच्या घटना घडल्यानं नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल हे अद्याप आपल्या कामाचा ठसा उमटवू शकलेले नाही. किंबहुना नागपूरच्या गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती कमी झाल्याचं चित्र भासू लागलं आहेत.

हेही वाचा:

  1. गोळीबार प्रकरण : आमदार गायकवाडांसह पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
  2. पुण्यात गोळीबाराचा थरार; सराफा व्यावसायिकानं दुकान मालकावर गोळीबार करुन संपवलं जीवन
  3. राज्यात पुन्हा एकदा गोळीबार; पैशाच्या वादातून एकावर गोळीबार; हल्लेखोरानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details