अहिल्यानगर/नाशिक : माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्यानं नाशिक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मधुकर पिचड यांनी अनेक महत्त्वाची राजकीय पदं सांभाळली आहेत. आदिवासी समाजातील कार्यकर्ते आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज्य सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही अनेक वर्षे काम केलं आहे. मधुकर पिचड यांनी १९८० ते २००९ पर्यंत नगर जिल्ह्यातील (आताचा अहिल्यानगर) अकोले विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. तर मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
"मधुकर पिचड यांचं साडेसहा वाजता नाशिक येथे निधन झालं. अंत्यविधीचा कार्यक्रम राजुर या मूळगावी शनिवारी दुपारी चार वाजता होणार आहे. अकोले महाविद्यालय आणि पक्ष कार्यालयात त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता मूळगावी पार्थिव नेलं जाईल. तिथे मधुकरराव पिचड महाविद्यालयात पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारनंतर अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होईल." - वैभव पिचड - मधुकर पिचड यांचे चिरंजीव
मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास : सुरुवातीच्या काळात शरद पवार यांचे खंदे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांची खरी राजकीय ओळख. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. परंतु २०१९ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मधुकर पिचड यांनी सहकार क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. अमृतसागर दूध सहकारी संस्था अकोले त्यांनी स्थापना केली. तसंच अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना करुन संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. सुरुवातीला सत्तरच्या दशकात जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि नंतर पंचायत समिती अकोले तालुका अध्यक्ष म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
आदिवासी कुटुंबात जन्म : मधुकर पिचड यांचा जन्म १ जून १९४१ रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे एक शिक्षक होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बी ए एल एल बी करुन वकिलीची शिक्षण पूर्ण केलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदार्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. त्यांच्या निधनानं कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री