विजय करंजकर यांची पत्रकार परिषद नाशिक Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेसाठी माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर प्रमुख दावेदार मानले जात होते. वर्षभरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनीही लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करण्याचे आदेश त्यांना दिले होते. मात्र, ऐनवेळी महाविकास आघाडीनं राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारणार असून वेळ पडल्यास निवडणूक लढवणार असल्याचं विजय करंजकर यांनी म्हटलं आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करंजकर यांनी पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
करंजकरांनी दिले बंडखोरीचे संकेत : 2014, 2019 नंतर आता पुन्हा एकदा 2024 ला विजय करंजकर यांना पक्षानं उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळं करंजकर यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक रोडच्या दत्त मंदिरात करंजकर समर्थकांनी एकत्र येत, उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नसल्याची खंत व्यक्त केलीय. तुम्हाला तिकीटच नाकारायचं होतं, तर वर्षभरापासून विजय करंजकर यांना तयारी का करायला सांगितली, असा संतप्त सवाल समर्थकांनी विचाराला आहे. त्यातच विजय करंजकर यांनी मी लोकसभा निवडणूक लढणारच असं म्हणत बंडखोरीचे संकेत दिले.
काय म्हणाले करंजकर : 'वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मला लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितलं होतं. त्यानंतर मी जिल्ह्यात नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. मला निवडणुकीचा अनुभव आहे, गेल्या वीस वर्षापासून मी निवडणुका जवळून पाहतोय. मी स्वतः भगूरचं नगरध्यक्ष पद भूषवलं आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख असताना अनेकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळेचा मला निवडणुकीचा चांगला अनुभव आहे. मी सर्व मतदार संघ पिंजून काढलाय. मतदारांचा मला पाठिंबा आहे. अनेक निवडणूक सर्व्हेमध्ये माझं नाव आघाडीवर आहे. असं असताना माझी उमेदवारी डावलून दुसऱ्याच्या गळ्यात उमेदवाराची माळ टाकली. पक्षाशी एकनिष्ठ राहून मला काय मिळालं?. याबाबत 'मी' लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून त्यानंतर पुढील दोन दिवसात निर्णय घेणार आहे. वेळ पडल्यास निवडणूक लढणार आणि जिंकणारसुध्दा' असं उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी विजय करंजकर यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का :
- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर - Lok Sabha Election 2024
- नितीन गडकरींनी नागपूर लोकसभेसाठी महायुतीकडून भरला उमेदवारी अर्ज, 5 लाखांनी विजयी होण्याचा गडकरींना विश्वास - Nitin Gadkari filed nomination
- वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीसह महायुतीला बसणार फटका - धनंजय महाडिक - Dhananjaya Mahadik