चंद्रपूर Leopard Attack On 7 Years Girl : बिबट्यानं एका सात वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला करुन गंभीर जखमी केलं. ही घटना बल्लारपूर शहरातील दीनदयाल उपाध्याय वॉर्डात बुधवारी घडली. आफ्रिना इकबाल शेख असं बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. बिबट्याला जेरबंद करण्याचे मोठं आव्हान वनविभागासमोर उभं ठाकलं आहे.
सात वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला :बल्लारपूर शहराला लागूनच वन विभागाचं मोठं जंगल आहे. यापूर्वी या परिसरामध्ये वाघ आणि बिबट्याचा वस्तीच्या आजूबाजूला वावर असायचा. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बल्लारपूर शहरांमध्ये कधी नव्हे तो मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहेत. बल्लारपूर शहरातील दीनदयाल उपाध्याय वॉर्डात ही सर्वात मोठी समस्या आहे. बुधवारी या वॉर्डातील आफ्रिना इकबाल शेख ही सात वर्षीय मुलगी शेजारच्या मुलांसोबत खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक तिच्यावर हल्ला चढवला. हे दृश्य बघताच खेळणारे मुलं घाबरुन पळायला लागली. त्यांनी आरडाओरड केल्यानं शेजारच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर बिथरलेल्या बिबट्यानं जंगलात धूम ठोकली.
चिमुकलीवर चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार :या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालया आणि महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी याच परिसरात या बिबट्यानं आणखी एकावर हल्ला केला होता. बल्लारपूर-विसापूर या क्षेत्रात दुचाकी चालविणाऱ्या अनेकांवरही हल्ला केला होता. त्यामुळे आता या परिसरात दहशतीचं वातावरण आहे.