पिंपरी : समाजातून दुर्लक्षित असणारा अविभाज्य घटक म्हणजे तृतीयपंथी. जुन्या परंपरा आणि रुढी विचारसरणीनुसार तृतीयपंथींना बहुतांश लोकांकडून तिरस्काराचा सामना करावा लागतो. निसर्ग कोणाला काय रूप देईल हे आपल्या हातात नसतानाही एक मोठी चूक असल्यासारखं तृतीयपंथीयांकडं पाहिलं जातं. या सर्व गोष्टींना फाटा देत पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि.28) राज्यातील पहिला तृतीयपंथीयांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यामुळं पुरोगामी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी एका स्तुत्य सामाजिक उपक्रमाची भर पडली असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
'नारी द वुमन' संस्थेचा अनोखा उपक्रम :'नारी द वुमन' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथीय पाच जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा बालाजी लॉन्स काळेवाडी येथे झाला. या उपक्रमास अनेक उद्योजक, नेतेमंडळी यांचं मौलिक सहकार्य लाभलं.
धुमधडाक्यात विवाह :सर्वांच्या मदतीनं अगदी जनसामान्यांचं धूम धडाक्यात लग्न पार पडतं, त्याच पद्धतीनं या लग्नात कसलीही कसर न करता प्रत्येक विधिवत कार्यक्रम इथं पार पडले. साखरपुडा, हळदी समारंभ, मेहंदी त्यानंतर मोठ्या लॉन्सवर सात फेरे घेत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत तृतीयपंथी सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. आजही आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात लैंगिक अंधश्रद्धा आहेत. ज्या दूर करण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करणं आवश्यक आहे. कायद्यानं तृतीय पंथीयांना शिक्षण अथवा नोकरीचा हक्क नाकारण्यात आला नसला तरी, सामाजिक दबावामुळं त्यांना आपली योग्यता सिद्ध करूनही माघार घ्यावी लागते. या सर्व गोष्टींना झुगारुन पिंपरी चिंचवड शहरातील या अनोख्या उपक्रमाची मोठी चर्चा होत आहे.
म्हणून केलं विवााह सोहळ्याचं आयोजन :आयोजकांशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की, तृतीयपंथीयांना सामाजिक दृष्टिकोनातून प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी, माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त होण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून या तृतीयपंथीयांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. सर्वात पहिलं त्यांच्या आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत विचार करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तब्बल १९० तृतीयपंथींना नोकरी प्राप्त करून दिली. त्यामधे रखवालदार, अतिक्रमण विभाग गार्ड, ड्राइव्हर म्हणून नोकरी करणारे तृतीयपंथी आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यात प्रामुख्यान आयुष्य जगण्यासाठी जोडीदार असावा म्हणून तृतीयपंथीय समुदायातील काही निवडक जोड्या एकमेकांसोबत राहण्यास आणि पुढील जीवन प्रवास सुखकर होण्यासाठी लग्न बंधनाची विचारणा केली असता पाच तृतीयपंथी जोड्या मिळून आल्या. त्यांच्या घरंच्यांच्या परवानगीनं हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आम्ही करत आहोत असे प्रतिपादन आयोजक नाना कांबळे यांनी केलं.
एक माणूस म्हणून विवाह सोहळ्याला उपस्थित :तृतीयपंथी सामुदायिक विवाह सोहळ्यात इतर तृतीयपंथी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सामान्य लोकांसारखे आपला आनंद व्यक्त करत होते. त्यात तेजु पुणेकर यांनी ई़टीव्ही भारतशी बोलताना सांगितलं की, एक तृतीयपंथी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून या विवाह सोहळ्यास उपस्थित आहे. या विवाह सोहळ्यात जेवढे सामान्य नागरिक उपस्थित राहिले ते मानवतेचा धर्म म्हणून आलेत. तृतीयपंथीयांना समजाबाहेर ढकललेलं असतं. भारत स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष झाली तरी, सुद्धा तृतीयपंथी समुदाय हा मागासलेला आहे. त्याला मूलभूत अधिकार मिळत नाहीत. आजही अन्न, वस्त्र, निवारासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे लग्न ही गोष्ट आमच्यासाठी खूप लांबची गोष्ट होती. आज सामुदायिक विवाह सोहळा होतोय, आमच्या आयुष्याला एक समतेची भावना तयार होत आहे. भारतीय न्याय व्यवस्थेनं आतापर्यंत कायदेशीररित्या लग्नाचा अधिकार दिला नव्हता. परंतु, गेल्या वर्षापासून आमच्या जीवनाविषयी नवीन कायदे तयार केले आहेत. त्यामुळं आम्हालाही कायदेशीर लग्न करता यायला पाहिजे अशी मागणी करु शकतो.