पुणे-राज्याचा नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होताना पाहायला मिळतेय. राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणे अशी लढत होत आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा आमदार होणार की युगेंद्र पवार विजय मिळवणार, अशी जोरदार चर्चा सध्या राज्यात आहे. अशातच आज दिवाळी पाडवा निमित्त बारामतीत पहिल्यांदा पवार कुटुंबीयांकडून दोन पाडव्याचे कार्यक्रम होताना दिसत असून, या दोन्ही पाडवा कार्यक्रमाला बारामतीकर तसेच राज्यातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळतंय.
बारामतीमधील काटेवाडीत दिवाळी पाडवा:गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गोविंद बाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळी पाडवा कार्यक्रम होत असतो. यात राज्यभरातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे बारामतीत येऊन पवारांची भेट घेत असतात. मात्र राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबात आज दोन पाडवा होताना दिसत आहेत. एक बारामती येथील गोविंद बाग येथे पवारांच्या उपस्थितीत तर दुसरा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपास्थित बारामती येथील काटेवाडीत दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम होतोय. दोन्ही ठिकाणी राज्यभरातून कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने आलेले दिसतायत.
पवार कुटुंबाचं घर कोणी फोडलं?:राष्ट्रवादी फुटीनंतर पवार कुटुंब एकत्र आहे, असं वारंवार अजित पवार आणि शरद पवार कुटुंबातील सदस्यांकडून सांगितलं जातंय. मात्र प्रत्यक्ष तसं होताना पाहायला मिळत नाही. बारामती विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेत अजित पवार हे भावनिक होत पवार कुटुंब कोणी फोडलं, असं म्हटलं. तर लगेच दुसऱ्या दिवशी पवारांनी सभेत अजित पवार यांची नक्कल करत त्याला उत्तर देत मी घर फोडलं ही गमतीची गोष्ट आहे, घर फोडायचं काहीही कारण नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलंय. यामुळे राजकारणात वेगवेगळी भूमिका घेणारे दोन्ही पवार कुटुंब खरंच एकत्र असल्याचं दाखवत तर नाहीत ना अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पवार कुटुंबात फूट पडली असून, ते न दाखवण्याचा दोन्ही बाजूंकडून प्रयत्न होत असल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संभ्रम पाहायला मिळतोय.
पवार कुटुंबात पहिल्यांदा दोन दिवाळी पाडवा:गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीमधील गोविंद बाग येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दिवाळी पाडवा कार्यक्रमात राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी येत असतात आणि या पाडवा कार्यक्रमात आपल्याला पवार कुटुंब एकत्र असल्याचं पाहायलादेखील मिळत असतं. पण राष्ट्रवादी फुटीनंतर आता अजित पवार यांनीदेखील बारामतीमधील काटेवाडी येथे दिवाळी पाडवा कार्यक्रमाचं आयोजन केल्याने पवार कुटुंबात पहिल्यांदा दोन दिवाळी पाडवा होताना पाहायला मिळतंय.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबात पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा - NCP TWO DIWALI PADWA
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबीयांकडून बारामतीतच दोन पाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.
गोविंद बागेत दिवाळी पाडवा (ETV Bharat File Photo)
Published : Nov 2, 2024, 12:42 PM IST