सातारा : जमिनीच्या वादातून एकानं परवान्याच्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्यानं सातारा शहरानजीकचा क्षेत्र माहुली परिसर हादरलाय. गोळीबारानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी देखील झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यास ताब्यात घेऊन पिस्तूल जप्त केलं. तसंच हाणामारी करणाऱ्यांची धरपकड केली. या घटनेनंतर क्षेत्र माहुली परिसरात तणावाचं वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
फायरिंग करणारा संशयित ताब्यात : जमिनीच्या वादातून हवेत फायरिंग करणाऱ्या विजयसिंह सर्जेराव जाधव (रा. क्षेत्र माहूली, सातारा) यास सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आलंय. याप्रकरणी रविराज देशमुख या तरुणानं सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
नेमका वाद काय? : क्षेत्र माहुलीतील रविराज देशमुख आणि विजयसिंह जाधव यांच्यात अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद धुमसत होता. बुधवारी (22 जाने.) दुपारी रविराज देशमुख हे शेतात काम करत असताना विजयसिंह जाधव त्याठिकाणी आले. दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर विजयसिंह जाधवनं परवाना असलेल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजानं क्षेत्र माहुली परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.