महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोनं विकायला गेले अन् दोन भाऊ बेपत्ता झाले; मुंबईत सराफा व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा लावला 'चुना' - Gold Theft In Mumbai

Gold Theft In Mumbai : सराफा व्यापाऱ्यांकडून सोनं घेऊन दोन भाऊ ते विकायला गेले. मात्र त्यांनी बनवाबनवी करुन पोबारा केला. या प्रकरणी मनीष भन्साळी आणि निखिल दिनेश आकचा या दोन सराफा व्यापाऱ्यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Gold Theft In Mumbai
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 8:05 AM IST

मुंबई Gold Theft In Mumbai : कोट्यवधी रुपयाचे दागिने विक्रीला घेऊन गेलेले दोघं भाऊ लंपास झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. या प्रकरणी मनीष भन्साळी आणि निखिल दिनेश आकचा या दोन तक्रारदारांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन संदीप पन्नालाल सोलंकी आणि जयेश पन्नालाल सोलंकी यांच्याविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 34, 409 आणि 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघं एकूण एक करोड 13 लाख 75 हजार रुपयांचे 1918.150 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले.

तक्रारदारांचा सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखाना :संदीप सोलंकी आणि जयेश सोलंकी या दोन भावांनी काळबादेवी येथे कनोरीया हाऊस मध्ये अरिहंत गोल्ड व अरिहंत ज्वेलर्स या नावाने दुकान थाटले होते. तक्रारदार मनीष भन्साळी हे प्रभादेवी येथे राहणारे असून त्यांचा काळबादेवी परिसरातील विठ्ठलवाडी येथे रूवी ज्वेलर्स हाऊस नावाचे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. भन्साळी यांच्या कुटुंबीयांचा सोने बनवण्याचा व्यवसाय आहे. भन्साळी गेल्या 17 वर्षांपासून सोन्याचा व्यवसाय करतात. पूर्वी विया ज्वेलर्स या नावानं सराफा व्यवसाय ते करत होते. मात्र नंतर मनीष भन्साळी यांचे भाऊ व्यवसायात मदत करत असल्यानं गेल्या एक वर्षापासून भागीदारीमध्ये रुवी ज्वेलर्स नावानं सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला. लोअर परेल येथील डीलाईल रोड परिसरात असलेल्या धनराज इंडस्ट्रियल इस्टेट येथे भन्साळी यांचा सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे.

आरोपींचा सोनं खरेदी विक्रीचा व्यवसाय :या व्यवसाय दरम्यान भन्साळी यांची सोने व्यापारी संदीप सोलंकी आणि जयेश सोलंकी यांच्याशी साधारण नऊ वर्षांपूर्वी ओळख झाली होती. सोलंकी बंधू यांचा काळबादेवी येथील विठ्ठलवाडी परिसरात परिसरात अरिहंत गोल्ड आणि अरिहंत ज्वेलर्स नावानं सोने खरेदी विक्रीचे इमिटेशन ज्वेलरीचे ऑफिस होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून सोलंकी बंधू यांनी नवीन ऑफिस काळबादेवी येथे सुरू केले. संदीप सोलंकी आणि जय सोलंकी ओळखीच्या व्यापाऱ्यांकडून सोने घेऊन त्याची विक्री करत आणि त्यावर मिळणाऱ्या कमिशनवर स्वतःचा उदरनिर्वाह करत. मनीष भन्साळी यांनी सोलंकी बंधू सोबत यापूर्वी व्यवहार केल्यामुळे त्यांनी विश्वास संपादन केलेला आहे.

सोनं घेताना अशी केली बनवाबनवी : 24 नोव्हेंबर 2023 ला सोने व्यापारी संदीप सोलंकी याने मनीष भन्साळी यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली होती. त्यानुसार, मनीष भन्साळी यांनी सोलंकी यानं पसंत केलेले 1251 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने त्याला दिले. 30 नोव्हेंबर 2023 ला संदीप सोलंकी याला मनीष भन्साळी यांचा भाऊ वृषभ भन्साळी यानं पसंत केलेला दागिन्यांपैकी 873 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे तयार केलेले दागिने काळबादेवी येथील सोलंकी यांच्या कार्यालयावर पोहोचवले. त्यावेळी संदेश सोलंकी यानं वाउचरवर सही करण्यास टाळाटाळ केली. उर्वरित दागिने घेताना वाउचरवर सही करतो, असं सांगतलं. दुसऱ्या दिवशी उर्वरित दागिने भन्साळी यांच्या दुकानात काम करणारा व्यक्ती संदीप सोलंकी याच्या कार्यालयावर घेऊन गेला. त्यावेळी देखील सोलंकीनं वाउचरवर सही करण्यास बगल देत पाच ते सहा दिवसांमध्ये सोने किंवा त्याचे होणारे पैसे देईन, त्यावेळेस सही करतो, असं सांगितले. संदीप सोलंकी त्याच्यासोबत अगोदर व्यवहार केलेला असल्यामुळे भन्साळी यांचा त्याच्यावर विश्वास होता. मात्र सहा डिसेंबर उजाडल्यानंतर संदीप सोलंकी याला भन्साळी यांनी सोन्याच्या दागिन्याबाबतच्या पैशाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यानं सोन्याचे दागिने दुसऱ्या व्यापाऱ्यांना विक्रीसाठी दिली असून दोन-तीन दिवसांमध्ये पैसे देणार असल्याचं त्यांना सांगितलं. त्यानंतर संदीप सोलंकी यानं दिलेल्या मुदतीच्या आत पैसे किंवा सोन्याचे दागिने न दिल्यानं भन्साळी यांना संशय आला. त्यानंतर संदीप सोलंकीचा भाऊ जयेश सोलंकी याला फोन केला असता, त्यानं उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच काळबादेवी येथील नव्या दुकानावर सोलंकी याला भेटण्यासाठी भन्साळी गेले असता त्यांचे दुकान बंद असल्याचे आढळून आले.

तक्रारदारांनी घेतली पोलीस ठाण्यात धाव :झवेरी बाजार परिसरामधील सोने व्यापारी निखिल आकचा यांच्याकडून 3 नोव्हेंबरला संदीप सोळंकी यानं 666.340 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने कमिशन विक्री करता घेऊन गेला होता. अशा प्रकारे संदीप सोलंकी यानं एकूण 1918.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कमिशनवर विक्रीसाठी घेऊन गेला आणि त्या दागिन्यांचा स्वतःच्या फायद्याकरता अपहार केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. "याप्रकरणी तपास सुरू असून आरोपीचा शोध घेत आहोत," अशी माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. मुंबई विमानतळावर 'कस्टम'नं वेगवेगळ्या कारवायांमध्ये 4 किलो 75 ग्राम सोनं केलं जप्त - Gold Seize On Mumbai Airport
  2. 'डीआरआय'ने सोन्याच्या तस्करीचा केला पर्दाफाश, 16 किलो सोनं आणि दोन कोटी 65 लाख रोख रक्कम केली जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details