छत्रपती संभाजीनगर FIR Against Jitendra Avhad : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात छत्रपती संभाजी नगरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारची बदनामी केल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय काळुंखे या तरुणानं तक्रार दाखल केली. आपल्या फायद्यासाठी चुकीची अफवा पसरवत सरकारची बदनामी केल्याचा आरोप विजय काळुंखे या तरुणानं आपल्या तक्रारीत केला.
सरकारला बदनाम करण्याचा आखला डाव :विजय काळुंखे या युवा व्यावसायिकानं गुरुवारी शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. आव्हाड यांनी त्यांच्या समाज माध्यमावर सरकार विरोधी वक्तव्य केलं होतं. लाडकी बहीण योजनेत महिलांना दीड हजार रुपये देताना आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येणारे एक लाख रुपये वळवले, असा आरोप केला. मात्र ही माहिती चुकीची असल्याचं विजय काळुंखे यांना वाटलं. त्यांनी याबाबत माहिती घेतली असता, शेतकऱ्यांना मदत देण्याचे सरकारी निर्देश असल्याचं समोर आलं. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सरकारला बदनाम करण्याचा डाव आखला आहे. लोकांसमोर खोटी माहिती देऊन दिशाभूल केलं जात असल्यानं आपण पोलिसात तक्रार दिल्याचं तक्रारदार युवक विजय काळुंखे यानं सांगितले. "जितेंद्र आव्हाड यांच्यावर 353/2 या कलमाखाली वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.